पुणे – करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून आजच्या तारखेपर्यंत सुमारे 6 लाख 60 हजार जण त्याने बाधित झाले. त्यातील 98 टक्के रुग्ण म्हणजेच 6 लाख 49 हजार 921 ठणठणीत बरे झाले आहेत. विलगीकरण, शक्य तितके औषधोपचार, आरोग्य खात्याचे परिश्रम या सगळ्यामुळे बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
राज्यातील करोना पहिला रुग्ण 9 मार्च 2020 ला पुण्यात आढळला. त्यानंतर करोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत गेली. देशात सर्वाधिक रुग्णांची संख्या पुण्यात होती. पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेतही पुणे याबाबत आघाडीवरच होते. मार्चमध्ये या प्रादुर्भावाला दोन वर्षे पूर्ण होतील. यानिमित्ताने आरोग्य विभागातर्फे या संपूर्ण परिस्थितीचे विश्लेषण केले जात आहे. त्यातून ही माहिती पुढे आली आहे.
व्हेरियंट बदलाने संभ्रम
सुरुवातीला पुण्यात रुग्ण आढळला, त्यावेळी उपचारांची नेमकी माहिती नव्हती. पुढे रुग्णसंख्या वाढली. रुग्णांच्या लक्षणांवर आधारित उपचार सुरू झाले. त्यासाठी औषधे, इंजेक्शन्स वापरण्यात आले. भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनेही (आयसीएमआर) उपचारांबाबत मार्गदर्शक तत्त्वं तयार केली. त्यानुसार उपचारांची दिशा झाली. व्हेरियंट बदलला, तशी लक्षणेही वेगाने बदलली आणि तेथेही बऱ्यापैकी संभ्रम निर्माण झाला.
मृत्यू संख्या साडेनऊ हजारांजवळ
शहरात आतापर्यंत 9 हजार 345 जणांचा करोनाने मृत्यू झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. त्यातील बहुतांश बाधित हे सहव्याधी असणारे होते, असे निष्कर्ष या विश्लेषणातून आरोग्य विभागाकडून काढण्यात आले आहेत.
नव्याने फक्त 44 बाधित
शहरात सोमवारी नव्याने फक्त 44 करोना बाधितांची नोंद करण्यात आली. तिसऱ्या लाटेतील ही सर्वाधिक कमी नोंद झाली आहे. याशिवाय सक्रिय बाधितांची संख्याही कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत 131 जणांना डिस्चार्ज दिला असून, आजपर्यंत 6 लाख 49 हजार 921 जण बरे झाले आहेत. 44 लाख 88 हजार 179 जणांचे स्वॅबटेस्ट घेण्यात आले. त्यातील 6 लाख 60 हजार 411 जण बाधित आढळले आहेत. दिवसभरात 2 हजार 649 संशयितांची स्वॅबटेस्ट झाली. 1 हजार 145 सक्रीय बाधितांमधील 7 जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, तर 65 जण ऑक्सिजनवर आहेत.