पुणे – ई-लॉकरमधून मिळणार भाडेकरार नोंद प्रत

पुणे – भाडेकराराची नोंदणी केल्यानंतर त्याची प्रत (सॉफ्ट कॉपी) आता थेट ई-लॉकरमध्ये साठवली जात आहे. यासाठी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने संगणक प्रणाली विकसीत केली असून डिजिटल लॉकरशी ही प्रणाली लिंक केली आहे. यासुविधेमुळे भाडेकराराचा दस्ताऐवज हव्या त्यावेळी उपलब्ध होत आहे.

महत्त्वाची कागदपत्रे प्रवासादरम्यान बाळगणे जोखमीचे काम असते. कधी कधी ही कागदपत्रे गहाळ होण्याचीही भीती असते. यावर तोडगा म्हणून केंद्र सरकारने डिजिटल इंडिया या उपक्रमांतर्गत आधारकार्डशी संबंधित नवीन “ई-लॉकर’ची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेमुळे महत्त्वाची कागदपत्रे “ई-लॉकर’मध्ये सुरक्षित ठेवता येणार आहे. या लॉकरमध्ये जन्माचा दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, वैद्यकीय प्रमाणपत्र, शैक्षणिक प्रमाणपत्र आदी प्रकारची महत्त्वाची कागदपत्रे अपलोड करून साठविता येण्याची सोय आहे. त्यासाठी www.digitallocker.gov.in या संकेतस्थळावर जाऊन लॉंगिग करणे आवश्‍यक आहे. मात्र, यासाठी आधार क्रमांक असणे गरजेचे आहे. नोंदणी विभागाने भाडेकरार ऑनलाईन पध्दतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याची नोंदणी झाल्यानंतर लिंक अप सुविधेमुळे याची प्रत डिजिटल लॉकर या प्रणालीमध्ये जात आहे. आधार क्रमांकाद्वारे संबंधित व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये ही सेव्ह केली जाते. त्यामुळे नागरिकांना या व्यवहाराची प्रत हवी असल्यास डिजिटल लॉकर या संकेतस्थळावर लॉगिंग करून त्याची प्रत मिळविता येत आहे. जर एखाद्या नागरिकाने डिजिटल लॉकरमध्ये अकाऊंट नसेल तर ती व्यक्ती जेव्हा अकाऊंट उघडेल तेव्हा त्यामध्ये संबंधित दस्ताची प्रत थेट सेव्ह होणार आहे, अशी माहिती नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.