पुणे – 40 लाख लीटर पाण्याची नासाडी

व्हॉल्व बदलण्यासाठी नदीत सोडले पाणी

पुणे – महापालिकेकडून दत्तवाडी परिसरातील जलवाहिनीवरील व्हॉल्व बदलण्याच्या कामासाठी तब्बल 40 लाख लीटर पाणी नाल्यात सोडून देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. तब्बल 30 हजार लोकसंख्येला पुरेल एवढे हे पाणी होते. मात्र, या प्रकारामुळे एका बाजूला पुणेकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असताना, अशाप्रकारे पाणी वाया घालविण्यात आल्याने महापालिका प्रशासनावर चांगलीच टीका होत आहे. दरम्यान, याप्रकरणी खासदार वंदना चव्हाण यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच, या पुढे अशी कामे करताना पाणी वाया जाणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

महापालिकेकडून 1 मे रोजी रात्री साडेअकाराच्या सुमारात दत्तवाडीमधील सरितानगरी येथील सुमारे 1200 मी.मी व्यासाच्या जलवाहिनीचा व्हॉल्व बदलण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यासाठी सुमारे साडेतीन किलो मीटरच्या जलवाहिनीतील पाणी थेट नाल्यात सोडावे लागले. मध्यरात्री सोडण्यात येत असलेले हे पाणी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सोडण्यात येत होते. हे पाणी जवळपास 40 लाख लीटर होते. तर प्रतिमानसी 135 लीट्‍र पाणी दिल्यास हे पाणी सुमारे 30 हजार लोकसंख्येला पुरेल एवढे होते. दरम्यान, या प्रकाराची माहिती स्थानिक नागरिकांनी खासदार चव्हाण यांना दिली. त्यानंतर त्यांनी माहिती घेतली असता हा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एका बाजूला धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत असल्याने शहरातील नागरिक पाण्यासाठी वणवण फिरत असताना, केवळ नियोजन न केल्याने हे पाणी वाया गेले आहे. ही बाब लक्षात घेता भविष्यात अशा प्रकारचे कोणतेही काम करताना आधी पाणी वाया जाणार नाही याचे नियोजन करण्यात यावे, अशी मागणी खासदार चव्हाण यांनी पत्राद्वारे आयुक्तांकडे केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.