पुणे -शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून या चौकात उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. मात्र या उड्डाणपुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने तसेच वाहनांची वर्दळ असल्याने या वाहनांचे हॉर्न तसेच आवाजाने महाविद्यालयातील क्लासरूम तसेच आवारात मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत आहे. हे ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिकेकडून या पुलावर ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यासाठीच्या प्रस्तावास महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
हा चौक रेल्वे स्थानक, विमानतळ, जुना राष्ट्रीय महामार्ग क्र. 4, जंगली महाराज रस्ता, गणेश खिंड रस्ता, बंडगार्डन रस्त्यावरील प्रमुख रुग्णालयांना जोडणारा महत्वाचा रस्ता होता. मात्र त्यामुळे या चौकात सातत्याने वाहतूक कोंडी होत असल्याने महापालिकेने या ठिकाणी तीन टप्प्यांत उड्डाणपुलाचे काम सुरू केले होते. तर 2017 मध्ये हा पूल सुरू करण्यात आला. मात्र हा पूल झाल्यानंतर त्याचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागल्याने तसेच वर्दळ वाढल्याने या वाहनांच्या आवाजाचा फटका महाविद्यालयातील क्लासरूम तसेच आवारातही बसत होता. त्यामुळे महापालिकेने या पुलावर ध्वनिरोधक लावण्याची मागणी केली होती. सर्वसाधारण मानकानुसार या भागात दिवसा 75 डेसिबल आवाज असणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र ध्वनीची पातळी 85 ते 90 डेसिबलच्या आसपास होती. मात्र, आता ध्वनिरोधक लावण्यात आल्यानंतर ही पातळी 15 ते 20 डेसिबलने घटणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.