पुणे (प्रतिनिधी) – शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असताना लॉकडाऊनमुळे शहरातील गरीब, गरजू, बेघर, कामगार, देहविक्री करणाऱ्या महिला अशा विविध घटकातील नागरिकांची उपासमार होत आहे. ही बाब लक्षात घेत पुणे शहर पोलिसांनी तब्बल तीन लाख ९३ हजार ३५४ अन्नाची पाकिटे व अन्नधान्य देत त्यांना आधार देण्याचे काम केले आहे.
त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी खास ‘सोशल पोलिसिंग सेल’ हा पोलिसांचा स्वतंत्र आपत्कालीन विभाग सुरु करुन त्याद्वारे लोकांना आधार देण्यास प्राधान्य दिले. शहरातील ३० पोलिस ठाण्याच्या माध्यमातून अडचणीत सापडलेल्या नागरिकांना स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक विभाग यांच्यामार्फत विविध घटकांना अन्नाची पाकिटे, अन्नधान्य देऊन त्यांना दिलासा दिला.