पुणे – सध्या कोरोनोच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर लाॅक डाऊन करण्यात आले असून त्यामुळे हॉटेल, मेस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जेवनाचे हाल होत आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर, सातवनगर भागातील वकील आणि पुणे बार असोसिएशनचे उपाध्यक्ष रवी लाढाणे आणि त्यांच्या सिरम कंपनीत असिस्टंट मॅनेजर असलेले जुळे बंधू डॉ. राकेश यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवन देण्याचे आवाहन केले होते.
त्यानुसार शुक्रवारी 3, शनिवारी 15 आणि रविवारी 30 जणांना मोफत जेवणाचे डब्बे देण्यात आले. 31 मार्चपर्यंत गरजूंना मोफत जेवण देणार असल्याचे लाढाणे बंधूंनी यावेळी सांगितले.
याविषयी, रवी म्हणाले, डॉ. राकेश काम करत असलेल्या कंपनीच्या आसपास अनेक मेस आहेत. तिथे खाणावळीची समस्या निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर मी आणि बंधूनी जेवन न मिळणाऱ्यांसाठी जेवन देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गरजूंनी मोबाईलवर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले.
त्यानुसार शुक्रवारी तिघांचा फोन आला. त्यांना जेवन दिले. शनिवारी रात्री 16 जणांना जेवणाचा डब्बा पोहोच केला. मगरपट्टा सिटी येथे काही पेईंग गेस्ट आहेत. रात्री 30 जणांकडून जेवणाची मागणी केली आहे. 31 तारखेपर्यंत ही सुविधा सुरू ठेवणार आहे.
आई-वडील, पत्नी यांच्याकडून मदत मिळत आहे. वकील साहित्य, पैशाची मदत करण्यास तयार आहेत. मात्र, अद्याप कोणाची मदत घेण्यात आलेली नाही. चपाती, भाजी, वरण, भात, ठेचा, सॅलेड असे जेवणाचे स्वरूप आहे. काही विद्यार्थी पार्टटाईम नोकरी करतात. त्यांना थोड्या दिवसासाठी गावी जाणे शक्य नव्हते. केवळ बिस्कीट खाऊन ते दिवस काढत असल्याचे निदर्शनास आले. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या पार्श्वभूमीवर जेवनासाठी आवाहन करण्यात आले.
मी हडपसर भागात राहत आहे. जास्त दुर प्रवास करून जेवन देणे शक्य नाही. त्यामुळे हडपसर भागातील गरजू विद्यार्थ्यांनी गरज असल्यास फोन करावा, त्यांना जेवन मिळण्याची व्यवस्था केली जाईल.
सध्याच्या परिस्थितीमुळे जेवन न मिळणाऱ्या हडपसर भागातील गरजूंनी अॅड. रवी लाढाणे यांच्या 8390249999/9890004602 आणि डॉ. राकेश लाढाणे यांच्या 9665171717 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
वकिलांनीही केली मदत…
पुणे बार असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांनी पर्वती भागात 5 गरजूंच्या जेवनाची सोय केली आहे. पुणे बार असोसिएशनचे माजी सचिव अॅड. केदार शिंदे यांनी सिंहगड रोडवर 3 गरजूंना जेवनाची मदत केली. तर, डेक्कन भागात अॅड. सागर सातपुते यांनी 3 जणांच्या जेवणाची सोय केली.