पुणे – नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला पाय धुतलेले पाणी प्यायला देऊन भोंदूगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा भांडाफोड केला. यात तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी वंशज गार्डन, पाषाण येथील ३९ वर्षीय महिला, विठ्ठलनगर पाषाण येथील ४५ वर्षीय महिला, सतीश चंद्रशेखर वर्मा ( ३३, रा. गणेश हाॅस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाषाण भागात एक महिला आणि तिचे साथीदार भोंदूगिरी करत असल्याची माहिती अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांना मिळाली होती. अंनिसचे कार्यकर्ते पोलिसांसह पाषाण परिसरात गेले. आरोपी आणि साथीदारांनी एक कन्सल्टन्सी संस्था सुरू केली होती. त्यांनी कार्यकर्त्यांना एक हजार रुपये भरण्यास सांगितले.
कार्यकर्ते विशाल कार्यालयातील एका खोलीत गेले. महिलेने त्यांच्या हातात गंडा बांधून राख खाण्यास दिली. महिला फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलीस तेथे गेले. पाेलिसांनी पंचनामा करून जादूटोण्याचे साहित्य जप्त केले. स्पर्धा परीक्षेत अपयश आल्याने एक तरुण नैराश्यात होता. समाजमाध्यमातील जाहिरात पाहून तरुण तेथे गेला होता. दैवी शक्ती असल्याची बतावणी करून आरोपींनी तरुणाकडून वेळोवेळी दीड लाख रुपये उकळले. चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक संभाजी गुरव, उपनिरीक्षक विद्या पवार आणि पथकाने कारवाई केली.