लोणावळा – राजकीय शत्रुत्वाला तिलांजली देत मावळचे आमदार सुनील शेळके आणि लोणावळ्याच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यात मनोमिलन झाल्याचे दृश्य शनिवारी पहायला मिळाले. गत चार वर्षात एकमेकांना पाण्यात बघत एक दुसर्याला राजकीय शह देण्याची एकही संधी न सोडणार्या या नेत्यांच्या भेटीने लोणावळा शहरातील राजकारणाची आणि विकासाची सममीकरणे मात्र बदलतील, हे मात्र निश्चित झाले आहे.
लोणावळा शहराची ओळख असणार्या कुरवंडे ग्रामपंचायत हद्दीमधील लायन्स पॉईंट याठिकाणी आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रयत्नातून तब्बल 333 कोटी 56 लाख रुपये खर्चून ग्लास स्कायवॉक प्रकल्प उभारण्यात येणार आहे. राज्य शासनाने नुकतीच या खर्चाला मंजुरी दिल्याने शनिवारी लोणावळा शहरात आमदार शेळके यांचा सर्वपक्षीय नागरी सन्मान आणि सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीव इतर राजकीय पक्षाचे मोजके पदाधिकारी उपस्थित होते. शहरातील काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी आमदार शेळके हे कार्यक्रमस्थळी पोचण्यापूर्वी त्यांची भेट घेऊन सत्कार केला होता. या सर्वपक्षीय सन्मान आणि सत्कार कार्यक्रमाला जाधव आणि पुजारी यांची हजेरी दिसली नाही. मात्र त्याचवेळी हा कार्यक्रम संपल्यानंतर आपण काही नेत्यांच्या भेटीला जाणार असल्याचं आमदार शेळके यांनी आपल्या भाषणातच जाहीर सांगितल्याने ते नक्की कोणाकडे जाणार याची कुजबुज उपस्थितांमध्ये सुरू झाली होती.
कार्यक्रम संपताच आमदार शेळके यांनी थेट माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच निवासस्थान गाठले. त्याठिकाणी या उभय नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली, ज्यात अनेक मुद्द्यांवर खुली तर काही मुद्द्यांवर बंद दाराच्या आड चर्चा झाली.राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांच्यात युती असून स्थानिक पातळीवर देखील या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी हातात हात घालून विकास कामांना गती दिली पाहिजे. त्यासाठी आपण स्वतः आज याठिकाणी सुरेखा जाधव यांना भेटण्यासाठी आल्याचे आमदार शेळके यांनी यावेळी सांगितले. तर मागील काळात आमच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले होते; मात्र वैयक्तिक वैर कधीच नव्हते असे सुरेखा जाधव यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीदरम्यान लोणावळा शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने लोणावळा शहरातील भांगरवाडी रेल्वे उड्डाणपूल, लीज प्रॉपर्टी विषय, भाजी मंडई इमारत, रोप वे प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, छत्रपती शिवाजी महाराज गार्डन, राजमाची गार्डन आदी विषयांचा समावेश होता. येत्या तीन ते सहा महिन्यांच्या कालखंडात हे सर्व विषय मार्गी लावण्यासाठी एकत्रित काम करण्याचा तसेच पुढील आठवड्यात यासंदर्भात एका आढावा बैठकीचे आयोजन करण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.
अनेकांच्या राजकीय आराखड्यांना सुरुंग ?
आमदार शेळके व भाजप पदाधिकार्यांचमध्ये सुमारे तासभर बंद दाराआड चर्चा झाली. याचर्चेमुळे राजकीय जाणकारांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. या नव्या मैत्री पर्वामुळेे शहरातील अनेकांच्या मनात त्यांच्या राजकीय इमल्याना सुरुंग लागतो की अशी भीती निर्माण झाली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर अनेकांनी मात्र या चर्चेचे स्वागत केले असून यातून लोणावळा शहरासाठी निश्चितच काही चांगलं घडण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
लोणावळा : माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यासह अन्य भाजप पदाधिकार्यांशी आमदार सुनील शेळके यांनी चर्चा केली.