कोरेगाव – कोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार यांनी आपल्या सहकार्यांसह उत्कृष्ट कामगिरी करून, जिल्हा पोलीस दलाची मान उंचावली आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पोलीस ठाण्याचा गौरव केला.
पोलीस उपअधीक्षक राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून, दोघांना जेरबंद केले होते. त्यांच्याकडून तीन लाख 45 हजार रुपये किमतीच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या होत्या.
दुचाकी चोरीच्या वाढत्या कोरेगाव पोलिसांनी गुन्ह्यांना आळा घातला होता. त्याचबरोबर नोव्हेंबरमध्ये अजामीनपात्र वॉरंटची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती.
सातारा येथे शनिवारी (दि. 16) झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या मासिक आढावा बैठकीत सपोनि सखाराम बिराजदार, हवालदार विजय जाधव, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार समाधान शेडगे, प्रमोद जाधव, गणेश शेळके, गणेश भोंग व अनिकेत जाधव यांचा प्रशस्तीपत्रे देऊन समीर शेख आणि अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी गौरव केला.