पुणे- रेल्वे प्रशासनाकडून हुबळी विभागातील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे दि. 29 एप्रिल ते 4 मे या कालावधीत या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असून, या मार्गावरील रेल्वे रद्द केल्या आहेत. तर काही एक्स्प्रेसचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.
25 एप्रिल ते 2 मे या कालावधीत एर्नाकुलम -पुणे एक्स्प्रेस मडगाव, रोहा, पनवेल, कर्जत आणि लोणावळामार्गे पुण्यात येणार आहे. तर 23 एप्रिल ते 4 मे दरम्यान हुबळी-दादर एक्स्प्रेस आणि 24 एप्रिल ते 5 मेदरम्यान दादर-हुबळी एक्स्प्रेस रद्द होणार आहे.
यासह बेंगळुरू – जोधपूर- बेंगळुरू एक्स्प्रेस, मैसूर-अजमेर- मैसूर एक्स्प्रेस, बेंगळुरू-अजमेर-बेंगळुरू एक्स्प्रेस, बेंगळुरू-गांधीधाम- बेंगळुरू एक्स्प्रेस, बेंगळुरू-जोधपूर एक्स्प्रेस, हजरत निजामुद्दीन- मैसूर एक्स्प्रेस या रेल्वेच्या पुणे विभागातील मार्गात बदल करण्यात आला आहे.