पुणे- कोरडवाहू म्हणून परिचित असलेल्या पुरंदर तालुक्यातील नगदी पीक म्हणून अंजीर आणि सीताफळ प्रसिद्ध आहेत. यातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळू लागल्यानंतर या फळांच्या ब्रॅंडिंगसाठी प्रयत्न सुरू झाले. सुरुवातीला पुणे-मुंबईसारख्या बाजारपेठ काबीज केल्यानंतर आता पुरंदरच्या अंजिरांनी थेट जर्मनीत धडक मारली आहे. पुढील काळात परदेशी बाजारपेठांत पुरंदरचे सीताफळही स्वत:चा ब्रॅंड तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
अंजिराचे उत्कृष्ट पद्धतीने ब्रॅंडिंग करून नवनवीन बाजारपेठा काबीज करण्याच्या उद्देशाने पुरंदर हायलॅंड्स फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड ही शेतकरी उत्पादक कंपनी कामकाज करत आहे.
त्यांनी “सुपर फिग’ (अंजीर) या नावाने पुरंदर अंजिराचा ब्रॅंड विकसित केला आहे. हॅम्बर्ग (जर्मनी) येथे असलेल्या पिल्झ शिंडलर जी.एम.डी.एच. यांना पाठवलेली चाचणी शिपमेंट यशस्वी झाली आहे. अंजीर या बाजारपेठेत उत्कृष्ट स्वरूपात परिपूर्ण परिस्थितीत पोहोचले आहे आणि तेथील खरेदीदारांनी त्यांची चव घेऊन कौतुकही केले आहे.
कंपनीने इस्राईलमधील कोल्डमॅन लॉजिस्टिक आणि वेअर हाऊस आणि जय जिनेंद्र कोल्ड स्टोअर यांच्या सहकार्याने पॅक हाऊस चाचण्या घेतल्या. यामध्ये 15 दिवसांसाठी अंजीर उत्तम स्थितीत आढळले.
दरम्यान, सिंगापूर ता. पुरंदर येथील मयूर लवांडे आणि सौरभ लवांडे यांच्या बागेतून अंजीर खरेदी करण्यात आले. केतन वाघ यांनी इस्राईल येथून पॅकेजिंग मटेरिअल मागून उपलब्ध करून दिल्यानंतर बायर क्रॉप सायन्सचे चेतन घोट यांनी युरोपकरिता आवश्यक तो निर्यात प्रोटोकॉल अंमलात आणून संपूर्ण प्रकल्पात आवश्यक ते सहकार्य केले.
मे. पिल्झ शिंडलरची भारतीय उपकंपनी असलेल्या मे. सी ऑन ऍग्रिकॉसने हॅम्बर्ग येथे मुख्यालयात या अंजिराची निर्यात करण्यास मदत केली आहे.
ही यशस्वी चाचणी कन्साइन्मेंट पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी चालना देणारी ठरत असून जगभरातील विविध बाजारपेठांमध्ये पुरंदर अंजीर एक व्यवहार्य कृषी माल म्हणून निर्यात करण्यासाठी निर्यातदारांकरिता एक नवीन उत्पादन उपलब्ध झाले आहे.
– सुनील पवार, पणन संचालक
मे. सिऑन ऍग्रिकॉसने हॅम्बर्ग येथे या अंजिराची निर्यात करण्यास मदत केली. ती निर्यात चाचणी पुरंदरच्या अंजीर उत्पादक शेतकऱ्यांसाठी चालना देणारी ठरेल.
– रोहन उरसळ, अध्यक्ष, पुरंदर हायलॅंडस फार्मर्स प्रोड्युसर कंपनी