पुणे – पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात स्वतंत्र व सुसज्ज असा अभिलेख कक्षच उपलब्ध नाही. यामुळे कार्यालयात मिळेल त्या जागेवर फायलींचे ढिगारेच्या अस्ताव्यस्त पडल्याचे दिसत आहेत. फायली व रजिस्टर गायब होण्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत. यामुळे कार्यालयाला अभिलेख कक्षाची व्यवस्था करण्यासाठी मुहूर्त कधी सापडणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत पुणे, अहमदनगर, सोलापूर या तीन जिल्ह्यांमधील शाळा, कनिष्ट महाविद्यालयांबाबतच्या प्रकरणांचे कामकाज चालत असते. नवीन शाळा मान्यता, तुकड्या व दर्जावाढ, विषय मान्यता, सांकेतांक क्रमांक, संच मान्यता, वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडी, वैद्यकीय बिले यासह अन्य विविध प्रकरणे दाखल होत असतात. फायली दाख़ल झाल्या, की त्यावर आवक क्रमांक नमूद करून ती संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात येतात. त्या निकाली निघाल्यानंतर जावक क्रमांक टाकून आदेश पत्रे संबंधितांना देण्यात येतात. मूळ फायली मात्र कार्यालयातच ठेवाव्या लागतात.
- मिळेल त्या जागेवर फायलींचे ढिगारे
- उंदीर, घुशींनी फायली कुरतडल्या
- शिक्षक व कर्मचारी मान्यतांची रजिस्टर गायब
- अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अडगळीत बसूनच काम
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय हे खूप जुने आहे. गेल्या काही वर्षांपासून या कार्यालयाची दुरवस्था झालेली आहे. कार्यालयात अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बाहेरून कामासाठी येणाऱ्या लोकांना पुरेशा सुविधाही उपलब्ध होत नाहीत. अधिकारी, कर्मचारी यांना अडगळीत बसूनच कामे करावी लागतात. त्यामुळे टेबलावर फायलींचा ढीग असतोच. जुनी झालेली कपाटे फायलींनी भरलेले आहेत.
आता फायली ठेवण्यासाठीच जागा कमी पडत असल्याने कपाटांवर, जमिनीवर व अन्य ठिकाणी फायली पडल्याचे विचित्र चित्र कार्यालयात सर्वत्र दिसून येते. उंदीर, घूस यांनी काही फायली कुरतडल्या आहेत. महत्त्वाच्या फायलीतील कागदपत्रांची अवस्था बिकट झालेली आहे. जुन्या फायली व अन्य रेकॉर्ड लवकर सापडत नाही. शिक्षक व कर्मचारी यांच्या वैयक्तिक मान्यतांची काही रजिस्टर गायब झालेली असून, याबाबत पोलिसांकडे तक्रारही नोंदविण्यात आलेली आहे.
यामुळे कार्यालयाला अभिलेख कक्षाची व्यवस्था करण्याबाबत जागा मिळाली पाहिजे. स्वतंत्रपणे कर्मचारी नियुक्त करून या कक्षाची जबाबदारी व सुरक्षितताही त्यांच्याकडे सोपविण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे.