पुणे ( Pune Bye Election ) – कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांचे गतवर्षी २२ डिसेंबरला प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. विद्यमान आमदार टिळक यांच्या मृत्यूमुळे कसबा विधानसभेची जागा रिक्त झाली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (बुधवार) पोटनिवडणूक जाहीर केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार पुढील महिन्यात (फेब्रुवारी) २७ तारखेला कसबा विधानसभेसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ७ फेब्रुवारी तर उमेदवारी मागे घेण्याची तारीख १० फेब्रुवारी असणार आहे. कसबा विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर होताच निवडणूक बिनविरोध होणार का? असा प्रश्न चर्चिला जाऊ लागला आहे.
पुण्यातही अंधेरी पूर्व प्रमाणे चुरस?
अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. येथे शिवसेनेने (ठाकरे गट) रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी अशी मागणी होत असताना देखील भाजपने येथून मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली होती. मात्र पुढे पक्षनेतृत्वाने पटेल यांना माघार घेण्यास सांगितल्याने ते निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले होते. असे असले तरी अपक्ष उमेदवारांनी माघार न घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.
अंधेरी पूर्वमध्ये महाविकास आघाडीने (शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस) त्यावेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी लावून धरलेली. मात्र भाजपने उमेदवार मैदानात उतरवून ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे राजकीय वातावरण चांगलंच पेटलं होत. अशातच आता भाजपचा विद्यमान आमदार असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लागल्याने अंधेरी पूर्वचे चित्र पाहायला मिळणार की निवडणूक बिनविरोध होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रुपाली ठोंबरेंचे ‘ते’ वक्तव्य
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्या ही जागा लढवण्यासाठी तयार असल्याचं जाहीररीत्या सांगितलं होत. मात्र त्यावेळी पक्षातर्फे त्यांना व इतर नेत्यांना कसबा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीबाबत कोणतेही वक्तव्य न करण्याची तंबी देण्यात आली होती.
महापालिका निवडणुकांची लिटमस चाचणी? | Pune Bye Election
पुणे व पिंरी चिंचवड या दोन्ही महापालिकांचा कार्यकाळ संपला असून दोन्ही ठिकाणी प्रशासक नेमण्यात आले आहेत. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये महापालिका निवडणुका देखील होणार आहेत. त्यापूर्वी कसबा व चिंचवड विधानसभेची निवडणूक महापालिकेची लिटमस चाचणी ठरू शकते. त्यामुळे राजकीय पक्ष हा चान्स घेणार का? असाही प्रश्न चर्चिला जातोय.