IND vs NZ – भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळला जात आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या सुरुवातीला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिलने त्याची मागील श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील लय कायम राखली आहे. त्याने श्रीलंकेविरुद्धच्या शेवटच्या एकदवासीय सामन्यात शतक झळकावले होते. त्यानंतर त्याने आता न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दमदार शतक झळकावले आहे.
प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि शुभमनने चांगली सुरुवात केली. पहिल्या गड्यासाठी या दोघांनीही ६० धावा जोडल्या. त्यानंतर रोहित ३४ धावांवर बाद झाला. त्यांना पुन्हा एकदा चांगली सुरुवात मिळाल्यानंतर मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील स्टार फलंदाज विराट कोहली अवघ्या ८ धावांवरच बाद झाला. त्यानंतर मैदानावर आलेला ईशान किशनही ५ धावा करून तंबूत परतला. मात्र, यानंतर सूर्यकुमार यादव आणि शुभमनने भारताच्या डावाला सावरले. दोघांनी मिळून चौथ्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी रचली. सूर्यकुमार यादव ३१ धावांवर असताना मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला.
भारताकडून शतक झळकावणारा शुभमन आणि हार्दिक पंड्या फलंदाजी करत आहेत. त्यामुळे भारत सध्या डावात ३४ षटकांत ४ गडी गमावून २१० धावांवर खेळात आहे. शुभमन ९४ चेंडूत २ षटकार आणि १४ चौकारांच्या मदतीने १११ धावांवर खेळत आहे. तर हार्दिक पंड्या २० चेंडूत १२ धावांवर खेळत आहे. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर बऱ्यापैकी फलंदाजी करू शकतात त्यामुळे भारताकडे जास्त फलंदाज शिल्लक नाही. भारताला मोठी धावसंख्या उभारायची असेल तर हार्दिक आणि शुभमन यांनी शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकणे गरजेचे आहे.
ICYMI – 𝙒𝙃𝘼𝙏. 𝘼. 𝙆𝙉𝙊𝘾𝙆! 💪 💪
That celebration says it ALL 👌 👌Follow the match 👉 https://t.co/IQq47h2W47 #TeamIndia | #INDvNZ | @ShubmanGill pic.twitter.com/OSwcj0t1sd
— BCCI (@BCCI) January 18, 2023
खेळपट्टी चांगल्याप्रकारे फलंदाजांना पूरक असल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारावी लागेल. पाहुण्या न्यूझीलंड संघाकडून गोलंदाजीत ब्लेअर टिकनर, मिचेल सँटनर, लॉकी फर्ग्युसन आणि डॅरिल मिशेल यांनी प्रत्येकी एक गडी बॅड केला. या एकदिवसीय मालिकेत टीम इंडियाला विजयी सुरुवात करण्याची चांगली संधी आहे. त्याचबरोबर मागील सामन्यात श्रीलंकेच्या फलंदाजांना लोटांगण घ्यायला लावणाऱ्या मोहम्मद सिराजवर सर्वांच्या नजरा असणार आहेत.