पुणे – गजबजलेल्या नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महापालिकेकडून गुंजन चौक ते शास्त्रीनगर चौकापर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला बस बे आणि हाॅकर्स प्लाझा उभारला जाणार आहे. यात पीएमपी, एसटी तसेच खासगी बसेसला प्रवासी वाहतुकीसाठी मुख्य नगर रस्त्यावर न येता रस्त्याच्या बाजूने प्रवासी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
मुख्य नगरस्ता हा ६० मीटर रूंदीचा असला तरी प्रत्यक्षात ४५ मीटर रस्त्यावरच वाहतूक सुरू आहे. तर गुंजन रस्ता ते शास्त्रीनगरपर्यंत सुमारे १५ मीटर रस्त्याची जागा महापालिकेच्या ताब्यात असून ही जागा रिकामीच आहे. ही बाब लक्षात घेऊन दोन लेनचा बस बे उभारण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त विकास ढाकणे यांनी ही माहिती दिली. याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
गुंजन चौकातील कोंडी फुटणार
विश्रांतवाडीकडून गुंजन चौकात येणारा रस्ता नगरस्त्याकडे वळताना या भागात मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली होती. ही अतिक्रमणे नुकतीच महापालिकेने काढलेली असली तरी या रस्त्यावर पुढे सकाळी आणि संध्याक़ाळी मोठ्या प्रमाणात खासगी बसेस, रिक्षा तसेच इतर खासगी प्रवासी वाहने रस्ता अडवून उभी असतात. तसेच समोरच्या बाजूला बीआरटी मार्ग असल्याने रस्ता आणखीच अरूंद होतो. मात्र, आता महापालिकेने बीआरटी काढल्याने इतर वाहनांना रस्ता वाढलेला असला तरी खासगी बसमुळे कोंडी कायम आहे.
ही बाब लक्षात घेऊन महापालिकेकडून या ठिकाणी सुमारे ८०० मीटर लांबीचा बस बे उभारला जाणार आहे. या ठिकाणी एका वेळी सुमारे पीएमपी तसेच खासगी वाहतुकीच्या २० बसेस थांबतील, १० ते १५ रिक्षा थांबू शकतील, अशी सुविधा असणार आहे. या शिवाय,या ठिकाणी येणार्या प्रवाशांच्या सुविधेसाठी हाॅकर्स प्लाझाही असणार असून महापालिकेच्या अतिक्रमण कारवाईत विस्थापित झालेल्या अधिकृत पथारी व्यावसायिकांना अथवा रस्त्यात अडथळा ठरणार्या व्यावसायिकांना या ठिकाणी स्टाॅल दिले जाणार असल्याचे ढाकणे यांनी स्पष्ट केले.
असा असेल बस बे
– ८०० मीटर लांबी
– एका वेळी २० बस थांबण्याची सुविधा
– पीएमपी, एसटी ला प्राधान्य
– प्रवाशांसाठी हाॅकर्स प्लाझा
– मुख्य रस्त्यावर थांबण्यास प्रवासी वाहनांना मनाई
– रिक्षा, कारसाठी स्वतंत्र सुविधा
-प्रवाशांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची सुविधा.