पुणे – सर्वसामान्य पुणेकरांपर्यंत आपल्या पक्षाची भूमिका पोहोचवायची आहे. याकरिता नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जोमाने काम करून अजित पवार यांचे काम तळागाळापर्यंत पोहोचवायचे असून अजित पवार यांचे हात बळकट करायचे आहेत. या हेतूनेच पुणे शहरात प्रथमच एवढी मोठी जम्बो कार्यकारणी जाहीर झाली, त्याबद्दल समीर चांदेरे यांचे कौतुक करू तेवढे कमीच आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीमध्ये कार्यकर्ते दिवस-रात्र झटत असतात पण त्यांना या कामानिमित्त योग्य त्यावेळी अजित पवार नक्कीच संधी दिल्याशिवाय राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा व पदनियुक्ती सोहळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहराध्यक्ष दिपक मानकर व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवाजी मराठा हायस्कूल, शुक्रवार पेठ, पुणे येथे संपन्न झाला यावेळी मानकर बोलत होते. या मेळाव्यास पुणे शहरातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी रूपाली चाकणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चाकणकर म्हणाल्या, घराणेशाही बाजूला ठेवून जो रस्त्यावर उतरून समाजाचे प्रश्न मांडतो, जो संघटनेला ताकद देतो, त्यांची कदर करत खऱ्या अर्थाने समीर चांदेरे यांनी या गोरगरीब व तळागाळातील कार्यकर्त्यांची पारख करून त्यांना संघटनेत काम करण्याची संधी दिली. सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन पुढे चालत असताना संघटना ही चळवळीची असली पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी काम केले पाहिजे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार व महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांच्या नेतृत्वात शहरातील संघटनेची बांधणी अतिशय मजबूत असून युवक संघटनेचा यात सिंहाचा वाटा आहे. युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी निवडणुकीच्या दृष्टीने काम करत असून याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष समीर चांदेरे यांनी यावेळी व्यक्त केला.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर कार्यकारिणीची बांधणी प्रगतीपथावर असून या मेळाव्याच्या निमित्ताने अनेक नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शहर उपाध्यक्ष -४५, चिटणीस-१४, सरचिटणीस-३६, संघटक सचिव-१६ व विधानसभा मतदार संघ अध्यक्ष म्हणून ९ असे एकूण १२० पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाबुराव चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे शहर कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, राज्य प्रवक्त्या रुपाली ठोंबरे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, पुणे कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष नांगरे, माजी विरोधीपक्ष नेते दत्ताभाऊ सागरे, आपा रेणुसे, प्रदीप धुमाळ, राकेश कामठे, युवक कार्याध्यक्ष मनोज पाचपुते, अब्दुल हाफिझ शेख, मनोज बालवडकर, अच्युत लांडगे, महिला शहराध्यक्ष प्रिया गदादे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष पूजा झोळे, महेश हांडे आदी मान्यवर उपस्थित होते.