पुणे – सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून देण्यासाठी पाच हजारांची लाच स्विकारणार्या शिक्षण विभाग कार्यालयातील महिला वरिष्ठ लेखाअधिकार्यासह कनिष्ठ लेखाअधिकार्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्विकारताना अटक केली.
वरिष्ठ लेखाअधिकारी प्रमिला प्रभाकरराव गिरी (38) आणि कनिष्ठ लेखाअधिकारी अनिल श्रीधर लोंढे (57) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका 43 वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे 8 फेब्रुवारी रोजी धाव घेतली होती.
सिनेगॉक स्ट्रीट पुणे येथे शिक्षण विभागाचे कार्यालय आहेत. तर तक्रारदार हे शिक्षक आहे. त्यांना त्यांच्या सेवा पुस्तकारवर सहाव्या व सातव्या आयोगानुसार वेतन निश्चितीची पडताळणी करून हवी होती. ती पडताळणी करून देण्यासाठी प्रमिला गिरी हिने लाच मागितल्याची तक्रार त्यांनी एसीबीकडे केली होती.
त्याआधारे गिरी सहा हजारांची मागणी करत होती. तसेच अनिल लोंढे देखील लाच मागणीस सहाय्य करत असल्याने दोघांना तडजोडी अंती पाच हजारांची लाच स्विकारताना अटक करण्यात आले. एसीबीचे पोलिस अधीक्षक अमोल तांबे, पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील, उपअधीक्षक विजयमाला पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.