पुणे – पाच वर्षांतील टॅंकरचे रेकॉर्ड मोडले

जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता भीषण : 250चा आकडा ओलांडला

पुणे – जिल्ह्यात टॅंकरने 250चा आकडा ओलांडला असून, पाच वर्षांतील सार्वाधिक टॅंकरचे रेकॉर्ड मोडले आहेत. या वाढत्या टॅंकरच्या संख्येवरून जिल्ह्यातील पाणी टंचाई अतितीव्र होत असून, वेळेत पाऊस आला नाही तर भीषण परिस्थिती पहायला मिळेल. याचे गांभीर्य लक्षात घेऊन आहे त्या उपलब्ध पाणी साठ्याचे काटेकोर नियोजन करणे गरजेचे आहे. गुरुवार (दि.30) पर्यंत जिल्ह्यात 256 टॅंकरद्वारे साडेचार लाख नागरिकांची तहान भागविली जात आहे.

2013-14 मध्ये जिल्ह्यात भयान दुष्काळाची परिस्थिती उद्‌भवली होती. पाण्यासाठी वणवण फिरूनही पुरेसे उपलब्ध होत नसल्यामुळे जगावे की मरावे अशी मानसिक स्थिती झाली होती. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने सर्वोतपरी प्रयत्न करत या दुष्काळाला तोंड दिले. या वर्षात तब्बल 250 टॅंकरद्वारे 174 गावे आणि 1 हजार 194 वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना पाणीपुरवठा केला जात होता. त्यानंतर मागील पाच वर्षांत पुरेसा पाऊस झाल्यामुळे ही परिस्थिती उद्‌भवली नाही. परंतु, यंदा पाच वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक भयान परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे.

सर्वाधिक टॅंकरची संख्या इंदापूर तालुक्‍यात असून, तब्बल 43 टॅंकद्वारे 32 गावे आणि 190 वाड्या-वस्त्यांवरील 84 हजार 657 नागरिकांची तहान भागविली जात आहे. तर बारामतीमध्ये 40 टॅंकरने 327 वाड्या-वस्त्यांवरील 73 हजार 732 नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे. त्यासाठी दररोज 122 फेऱ्या सुरू आहेत. पुरंदर आणि शिरूर तालुक्‍यांत टॅंकरची संख्या प्रत्येकी 29 आहे. आंबेगाव येथे 23, जुन्नरमध्ये 21, खेडला 15 तर दौंडमध्ये 25 टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान, दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज 675 टॅंकरच्या फेऱ्या सुरू आहेत.

मावळमध्ये एकही टॅंकर नाही
जिल्ह्यातील तेरा तालुक्‍यांपैकी मावळ आणि मुळशीमध्ये एप्रिल अखेरपर्यंत टॅंकर सुरू करण्याची वेळ आली नव्हती. परंतु, मुळशीतील 4 गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्‍न गंभीर बनल्यामुळे सध्या 4 टॅंकर याठिकाणी सुरू आहे. मात्र, मावळ तालुक्‍यात एकही टॅंकर सुरू नसून पाऊस लांबला आणि जून महिन्यातही पुरेशा पाऊस झाला नाही तर मावळ तालुक्‍यातही टॅंकर सुरू करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे “पावसा आता तरी लवकर ये’ अशी विनवनी सर्वांकडून वरूणराजाला केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.