रेल्वेस्थानकावर वायफायची मोफत सेवा

कराड रेल्वे प्रशासनाचे नवनवीन प्रयोग; प्रवासीवर्गामधून समाधान
जहॉंगीर पटेल
ओगलेवाडी – कराड रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाकडून मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा पुरेपुर फायदा घेत सध्या प्रवासी मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. परिणामी प्रवाशातून समाधान व्यक्‍त केले जात आहे. कराड रेल्वे स्थानक नेहमीच नवनवीन प्रयोग करत असते. याचाच एक भाग म्हणून कराड रेल्वे स्थानकात मोबाईलला हवा असणारा डेटा आता अगदी मोफत मिळणार आहे.
कराड रेल्वे स्थानक हे जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते.

येथे दररोज 30 ते 35 वेगवेगळ्या गाड्या धावत असतात. परिणामी येथे हजारो प्रवाशांचा राबता असतो. सर्वच गाड्या या रेल्वे स्थानकावर थांबतात. परिणामी या ठिकाणी प्रवाशांची वर्दळ नेहमीच असते. सध्या गरजेचा बनलेला मोबाईल जवळपास सर्वच प्रवाशांच्या हातात दिसतो. व्हॉट्‌सऍप, फेसबूक अनेक सुविधांचा मोबाईलव्दारे वापर करतात. यासाठी नेटची सुविधा असणे आवश्‍यक आहे. प्रवाशांची करमणूक किंवा त्यांची गरज ओळखून कराड रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी स्थानकावर मोफत वायफाय सुविधा सुरू केल्याने अनेक प्रवाशी या सेवेचा लाभ घेताना दिसत आहेत.

काहीतरी वेगळे करण्याचा संकल्प कराड रेल्वेस्थानकाने अवलंबला व तो प्रवाशांना सुध्दा आवडला. जिल्ह्यातील सर्वात मोठे स्थानक म्हणून ओळख असणाऱ्या कराड स्थानकाने यापूर्वी अनेक उपक्रम राबविले आहेत. स्थानकावर असलेली स्वच्छता व रंगीबेरंगी भिंती आता येथील प्रवाशांचे कुतूहलाचा व चर्चेचा विषय बनला आहे. एकीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत असताना दुसरीकडे कराड स्थानकावर रेखाटलेल्या विविध चित्रांमुळे पर्यावरणाचा संदेश प्रवाशांपर्यंत पोहचत आहे. कराड रेल्वे स्थानकावर अनेक विविध प्रकारचे नवनवीन बदल नेहमीच पाहावयाला मिळतात. याचाच एक भाग म्हणून सध्या सुरू असलेल्या मोफत वायफाय सेवा हाही त्याचाच एक भाग आहे. या सेवेची जी रेंज आहे ती सुमारे स्थानकापासून पन्नास मीटर अंतरापर्यंत आहे.

कराड रेल्वेस्थानकावर यापूर्वी वेगवेगळी झाडे लावण्यात आलेली होती, त्या झाडांची निगा देखील राखली गेली. परिणामी या स्थानकावर भरपूर प्रमाणात विविध फुलझाडे आहेत. त्याचबरोबर स्वच्छता देखील या स्थानकावर चांगली असते. त्यामुळे एकंदरीत रेल्वे प्रशासनाच्या या नवनवीन प्रयोगाचे नागरिकांसह प्रवासी वर्गामधून स्वागत केले जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here