पुणे -प्राथमिक शिक्षण संचालनालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक मशीनद्वारेच हजेरी नोंदविण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे बायोमेट्रिकवरील उपस्थितीच ग्राह्य धरण्यात येणार आहे. बायोमेट्रिक अहवालानुसार अनुपस्थितीत दिवसांची नोंद सेवापुस्तकात घेण्यात येणार आहे. शासकीय कामानिमित्त दौऱ्यावर जायचे असल्यासही शिक्षण संचालकांची मान्यता घ्यावी लागणार आहे. दरम्यान यामुळे आता कार्यालयीन कामकाजाला खरी शिस्त लागणार आहे.
प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणासाठी प्राथमिक शिक्षण संचालनालयाची स्थापना करण्यात आली. कार्यालयीन कामकाजाचे व्यवस्थापन व सनियंत्रण करुन नागरिकांची व प्रशासनाची कामे वेगाने होण्यासाठी कामकाज वेळेत होणे आवश्यक असते. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहण्याबाबत कालावधी निश्चित करुन दिलेला आहे. मात्र काही अधिकारी, कर्मचारी कार्यालयात वेळेत उपस्थित राहत नसल्याचे व काही जण सतत गायब होत असल्याची बाब अनेकदा निदर्शनास आलेली होती. यामुळे कार्यालयीन कामकाजावर परिणाम होत होता.
प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी याचे गांभीर्य लक्षात घेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक पध्दतीचा अवलंब करण्याचा निर्णय घेत त्याची तात्काळ अंलबजावणीही सुरु केली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या आस्थापनेवरी व संचालनाच्या अधिनस्त असलेल्या प्रधानमंत्री पोषण शक्ती निमारण योजना कक्षातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती बायोमेट्रिकद्वारेच नोंदविणे अनिवार्य करण्यात आले आहे.
सकाळी कार्यालयात उपस्थित राहताना व सांयकाळी कार्यालय सोडताना बायोमेट्रिक मशीनवर नोंदी करणे अनिवार्य केले आहे. कार्यालयीन वेळेत शासकीय कामाकरीता कार्यालयाच्या बाहेर जावयाचे झाल्यास कार्यालय सोडताना व पुन्हा कार्यालयात येताना बायोमेट्रिक मशीनवर नोंद करणे अनिवार्य असेल. प्रत्येक महिन्याचा बायोमेट्रिक मशीनद्वारेचा जनरेट झालेला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उपस्थिती, अनुपस्थितीचा अहवाल दरमहा 5 तारखेपर्यंत शिक्षण संचालकांकडे सादर करावा लागणार आहे.
प्राथमिक शिक्षण संचालनालयात यांत्रिक हजेरी वेळेची निश्चिती
कार्यालयीन कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सांयकाळी 6.15 अशी निश्चित करण्यात आलेली आहे. शिपायांच्या कामकाजाची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 6.30 अशी करण्यात आलेली आहे. दुपारी 1 ते 2 यावेळेत जास्तीत जास्त अर्धा तासाची भोजनाची सुट्टी असेल.