पुणे – पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी एमएसआरडीसीने रिंगरोड प्रकल्प हाती घेतला आहे. पूर्व रिंग रोड आणि पश्चिम रिंग रोड, असे दोन भाग आहेत. एका बाजूला रिंगरोडच्या भूसंपादनाचे काम गतीने सुरू असताना दुसऱ्र्या बाजूला रिंगरोडसाठी टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
रिंगरोडचे काम वेळेत पूर्ण होण्यासाठी पश्चिम रिंगरोडचे पाच पॅकेज तर पूर्व रिंगरोडचे चार पॅकेज करण्यात आले आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या दोन -तीन महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच रिंगरोडचे भूमिपूजन करण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
रिंगरोड हा प्रकल्प राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या रिंगरोडला राज्य सरकारकडून विशेष राज्य महामार्गाचा दर्जा दिला आहे. पूर्व व पश्चिम रिंगरोडची एकूण लांबी १३६ किमी असून रुंदी सुमारे ११० मीटर इतकी असणार आहे. यामध्ये पूर्व रिंगरोड हा ७१.३५ किमी लांबीचा तर पश्चिम रिंगरोड हा ६५.४५ किमी लांबीचा आहे. भूसंपादनामध्ये पश्चिम रिंगरोडने गतीने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम रिंगरोडचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे.
पश्चिम रिंगरोडचे पाच टप्पे अर्थात पाच पॅकेज करण्यात आले आहे. आठ बोगदे, तीन छोटे पूल, दोन मोठे पूल आणि खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवरून अर्धा किलोमीटर लांबीचा मोठा पूल अशी कामे होणार आहे. त्यामुळे ६५ कि.मी लांबीचा रिंगरोडचे काम लवकर होण्यासाठी पाच टप्पे करण्यात आले असून एकाच वेळी पाच टप्प्यातील रिंगरोडचे काम सुरू करण्याचा मानस एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पश्चिम रिंग रोड हा भोर, हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यातून जाणार असून तर पूर्व रिंगरोड हा मावळ, खेड, हवेली, पुरंदर आणि भोर तालुक्यातून जाणार आहे. या रिंगरोडसाठी एमएसआरडीसीने यापूर्वीच ठेकेदार कंपन्यांची पात्रता तपासण्यासाठी टेंडर प्रक्रिया राबविली होती.
आता एमएसआरडीसीने रिंगरोडच्या प्र्त्यक्ष काम देण्यासाठी कंपन्यांकडून निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार दि.१७ जानेवारी ते दि. १ मार्च २०२४ पर्यंत टेंडर मागविण्यात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच रिंगरोडचे भूमिपूजन करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
पश्चिम रिंगरोड टप्पे
पहिला टप्पा – १४ कि.मी
दुसरा टप्पा – २० कि.मी
तिसरा टप्पा – १४ कि.मी
चौथा टप्पा -७.५० कि.मी
पाचवा टप्प्पा – ९.३० कि.मी
पूर्व रिंगरोड टप्पे
पहिला टप्पा – ११.८५ कि.मी
दुसरा टप्पा – १३.८० कि.मी
तिसरा टप्पा – २१.२० कि.मी
चौथा टप्पा -२४.५० कि.मी