पिंपरी – पिंपरी येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी कमी किंमतीत औषधे मिळावीत, यासाठी पिंपरी चिंचवड कर्मचारी महासंघाच्या वतीने मेडिकल सुरू करण्यात आले आहे. परंतु, मार्च २०२२ पासून संघाच्या दोन्ही गटातील वादात हे मेडिकल बंद आहे. परिणामी मेडिकलमधील लाखो रुपयांची औषधे ‘एक्सपायर’ झाली असून, महासंघाला त्याचा भुर्दंड बसला आहेच, रुग्णांनाही त्याचा वापर करता येत नाही.
पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघाने ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात रुग्णांसाठी मेडिकल सुरू केले होते. या मेडिकलमधून बाह्य रुग्ण विभाग आणि अत्यावश्यक रुग्ण विभागातील रुग्णांना तसेच बाहेरून आलेल्या नागरिकांनादेखील दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या, औषधे मिळत होती. हे मेडिकल सुरू झाल्यामुळे वायसीएम रुग्णालयातील बाह्य रुग्ण व अत्यावश्यक विभागातील उपचारास येणाऱ्या दोन ते तीन हजार रुग्णांना मोठा दिलासा मिळाला होता.
दरम्यान, महापालिका कर्मचारी महासंघाची मार्च २०२२ रोजी निवडणूक झाली. या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष असलेल्या अंबर चिंचवडे गटावर बबन झिंजुर्डे गटाने मात करत महासंघावर सत्ता मिळवली. निवडणुकीत झिंजुर्डे गटाने बाजी मारल्यामुळे महासंघाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला जाऊन तो न्यायालयात गेला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर देखील वायसीएम रुग्णालयातील महासंघाच्या मेडिकलचा ताबा मिळत नव्हता. त्यानंतर ते ताब्यात घेण्यात आले. त्यानंतरही वायसीएम रुग्णालयातील मेडिकलमध्ये औषधांचा साठा किती शिल्लक आहे, याचा अहवाल सत्ताधारी झिंजुर्डे गटाने तत्कालीन चिंचवडे गटाकडे मागितला. मात्र, त्यावरून दोन्ही गटात वाद झाला.
दोन वर्षे मेडिकल बंद
दरम्यान, महापालिका कर्मचारी महासंघाच्या सत्ताधारी गटाने रुग्णालयातील मेडिकलचा ताबा घेत ते उघडले असून, सद्य स्थितीत मेडिकलमधील उपलब्ध गोळ्या आणि औषधांचे आॅडिट सुरू आहे. तसेच किती स्टॉक शिल्लक होता, किती गोळ्या औषधांच्या तारखा एक्सपायर झाल्या आहेत, हे तपासले जात आहे. वादामुळे मार्च २०२२ रोजी मेडिकल बंद करण्यात आले. त्यानंतर आजतागायत आजी- माजी पदाधिका-यांच्या वादात हे मेडिकल बंद होते. त्याला दोन वर्षे होत आहेत.
कर्मचारी महासंघाच्या सत्ताधारी गटाने मेडिकलचा ताबा घेतला असून, दोन ते तीन दिवसांमध्ये हे मेडिकल पुन्हा सुरू होणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक व बाह्य रुग्णांना दहा ते वीस टक्के सवलतीच्या दरात गोळ्या औषधे मिळणार असून रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
– बबन झिंझुर्डे, अध्यक्ष, पिंपरी महापालिका कर्मचारी महासंघ.