पुणे – परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी चौकात वाढदिवसाचा केक कोयत्याने कापतानाचा व्हिडिओ तयार केला. तो व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करणाऱ्या “बड्डे बॉय’ तरूणाला गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अटक केली. त्याच्याकडून कोयता जप्त केला असून, या कारवाईमुळे चौका-चौकात वाढदिवस साजरा करणाऱ्यांना आळा बसेल.
आतिष जालिंदर लांडगे (वय 26, रा. काशिविश्वनाथ महादेव मंदिरा मागे, काशेवाडी) असे अटक केलेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनिट 1 चे पथक हद्दीत गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग आणि गुन्हेगारांची तपासणी करत असताना, 9 एप्रिल रोजी कासेवाडी भागात लांडगे याने त्याचा हातात कोयता घेऊन वाढदिवसाचा केक कापला. त्यानंतर परिसरात आरडा-ओरडा करत राडा केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर असल्याची माहिती पोलिस अंमलदार अमोल पवार यांना मिळाली.
त्यानुसार वरिष्ठांच्या सुचनेनुसार आतिष लांडगे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून कोयता जप्त केला. पुढील कारवाईसाठी खडक पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले, सहाय्यक निरीक्षक आशिष कवठेकर, उपनिरीक्षक अजय जाधव, पोलीस अंमलदार अमोल पवार, इम्रान शेख अजय थोरात, अय्याज दड्डीकर, दत्ता सोनवणे, अनिकेत बाबर यांनी केली.
व्हिडिओ पडला आणि बड्डे बॉयला चांगलेच अंगलट आले; पाच महिन्यांनी कारवाई
वाढदिवसला चौकांमध्ये टेबल ठेवून मित्रांची गर्दी कररत केक कापायचा. काही तरूण तर कोयता, तलावरीने केक कापत असल्याचे फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले. केवळ परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी हे बेधुंद प्रकार केले जातात. त्याला आळा बसण्यासाठी युनिट 1 कडून ही कारवाई केली असून, पाच महिन्यांनी हा व्हिडिओ पोलिसांसमोर आल्यावर लागलीच कारवाई केली. त्यामुळे “बेधुंदपणे वाढदिवस’ आता थेट कारागृहात पाठवू शकतात.