पुणे- वाढती महागाई आणि इंधन दरवाढ यावरून कॉंग्रेस आक्रमक झाली असून महिला कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचा जाहीर निषेध करत त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकीत हॉटेलबाहेर चूल आणि बांगड्या देण्यासाठी आलेल्या महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. केंद्रात तत्कालीन युपीए सरकारविरोधात महागाईवरून इराणी यांनी केंद्राला बांगड्या भेट दिल्या होत्या. त्याचे प्रत्युत्तर म्हणून “सध्या वाढलेल्या महागाईवर इराणी गप्प का’, असा सवाल करत त्यांना बांगड्या व चूल भेट दिली जाणार होती. यावेळी भाजप कार्यकर्ते आणि कॉंग्रेसच्या महिला यांच्यात झटापट झाल्याचे दिसून आले. यानंतर कॉंग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चतु:शृंगी पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
केंद्रीयमंत्री इराणी या “भाजपची वाटचाल’ या पुस्तक सोहळ्याच्या प्रकाशनासाठी पुण्यात येणार असल्याने कॉंग्रेसने आधीच त्यांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र, त्या आधी त्या एका कार्यक्रमासाठी सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेलमध्ये येणार असल्याने महिला शहराध्यक्ष पूजा आनंद यांच्यासह अनेक कार्यकर्त्या आधीच हॉटेलमध्ये दाखल झाल्या होत्या. त्यानंतर हॉटेलमध्ये बंदोबस्त वाढताच तसेच इराणी आल्याचे समजताच या महिला कार्यकर्त्यांनी प्रवेश द्वारावरच घोषणाबाजी करत गोंधळ घातला. यावेळी वातावरण चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन तत्काळ या महिलांना पोलिसांनी अटक केली.