पुणे – बायको पांढऱ्या पायगुणाची आहे. तिच्या दुषित ग्रहमानामुळे तू आमदार व मंत्री होणार नाहीस, असे सांगून विवाहितेच्या छळाला कारणीभुत ठरल्याप्रकरणात प्रसिध्द ज्योतिषाचार्य रघुनाथ राजाराम येंमुल गुरूजी (वय 48, रा. बाणेर) यांना पंधरा हजाराचा जामीन झाला आहे. याबाबत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.व्ही.निमसे यांनी आदेश दिला आहे.
बचाव पक्षातर्फे ऍड. प्रताप परदेशी आणि ऍड. किर्तिकुमार गुजर यांनी जामिनासाठी अर्ज केला. उच्चशिक्षित सुनेला सिगरेटचे चटके देत, बहिरेपणा येईपर्यंत अमानुष मारहाण करणाऱ्या उद्योजकासह कुटुंबातील तिघांसह आठ जणांविरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
या प्रकरणात येमुल यांच्यावर विवाहितेचा छळ, फसवणूक, हुंडा प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केल्यानंतर सुरूवातीला पोलीस कोठडी, त्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज करण्यात आला.