पुणे – तळवडे येथील शिवराज एंटरप्रायझेस येथे स्पार्कल कॅण्डल बनवित असताना अचानक लागली होती. या आगीतील मृत कामगारांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देणार असल्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी विधानसभेत सांगितले. तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
घटनेनंतर या आस्थापनेवर कामगार उपआयुक्त कार्यालयामार्फत विविध कायद्यांतर्गत निरीक्षण शेरे नोंदविण्यात आलेले असून खटले दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे खाडे यांनी सांगितले. दि. ८ डिसेंबर रोजी या कारखान्यात अचानक आग लागली होती. या घटनेत एकूण १५ महिला कामगारांपैकी ६ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमी महिला कामगारांपैकी ९ जखमी कामगारांवर उपचार सुरू असताना त्यापैकी ३ कामगारांचा मृत्यू झाला.
उर्वरित ६ महिला कामगार व एका पुरुष व्यक्तीवर उपचार सुरू आहेत, असे मंत्री खाडे यांनी सांगितले. या आस्थापनेचे बांधकाम हे अनधिकृत असून आवश्यक मान्यता घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या आस्थापनेने कारखाने अधिनियमांतर्गत परवाना घेतला नसल्याचे दिसून आले असल्याचे खाडे यांनी निवेदनातून स्पष्ट केले.