पुणे – वारंवार सूचना करूनही मिळकतकर थकबाकी भरली जात नसल्याने सील केलेल्या २०२ मिळकतींचा पालिकेकडून लिलाव केला जाणार आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे ५२ कोटी रुपयांची थकबाकी असलेल्या ३२ मिळकतींचा लिलाव प्रशासनाने जाहीर केला होता.
या मिळकतींची बाजारभावातील किंमत तब्बल दोनशे कोटींपेक्षा अधिक होती. दरम्यान, ही कारवाई सुरू होण्यापूर्वीच तब्बल २० मिळकतधारकांनी मिळकतकर भरला आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात आता केवळ १२ मिळकती असणार आहे. येत्या दि. ५ फेब्रुवारी रोजी यातील पहिला आॅनलाइन लिलाव होणार आहे.
महापालिकेकडून लिलाव प्रक्रिया जाहीर केल्यानंतर तसेच मिळकतींचे बाजारमूल्य निश्चित केले होते. या ३२ मिळकतींचा महापालिकेचा मिळकतकर सुमारे साडेसहा कोटींचा असून या मिळकतींचे बाजारमूल्य प्रत्यक्षात २०० कोटी आहे. महापालिकेने याबाबत मिळकतधारकांना नोटीस दिल्यानंतर त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता.
महापालिका लिलाव करणार नाही आणि नेहमीप्रमाणे नोटीस बजावेल, असा अंदाज होता. मात्र, प्रत्यक्षात पालिकेने लिलावाची तारीख जाहीर करून अंतिम नोटीस देताच खडबडून जागे झालेल्या २० मिळकतधारकांनी १ कोटी ६० लाखांचा कर जमा केला आहे. दरम्यान, लिलावासाठी महापालिकेसही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र असून आतापर्यंत केवळ ६ ते ७ जणांनीच लिलावासाठी नोंदणी करून एक टक्का अनामत रक्कम भरली आहे.
अपेक्षित प्रतिसाद नाही
मिळकतकराच्या लिलावात सहभागी होणार्या खरेदीदारांना मिळकतीच्या मूल्याच्का एक टक्के अनामत रक्कम भरावी लागते. मात्र, २० मिळकती वगळता आता उर्वरित मिळकती या व्यावसायिक असल्याने त्याचे बाजारमल्य मोठे आहे. त्यामुळे खरेदीदारांना जादा अनामत रक्कम भरावी लागत आहे. त्यामुळे कमी अर्ज आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.