– रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष प्रशांत बागल यांची माहिती
मंचर – मंचर ता. आंबेगाव येथे संपन्न झालेल्या शेतकरी कृषी महोत्सवाला सुमारे २ लाख ५० हजार शेतकऱ्यांनी भेट दिली, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ मंचरचे अध्यक्ष प्रशांत बागल यांनी दिली.
सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या संकल्पनेतून शेतकरी कृषी महोत्सव संपन्न झाला. आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघ, मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती, अडत व्यापारी असोसिएशन, अनुसया महिला उन्नती केंद्र तसेच रोटरी क्लब ऑफ मंचर या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने यशस्वीपणे या महोत्सवाचे नियोजन केले जाते.
नवनवीन कृषी तंत्रज्ञान, शेती अवजारे, प्रक्रिया उद्योग, बांधकाम क्षेत्र, गृह उपयोगी वस्तू उत्पादने, महिला बचत गट उत्पादने, खाद्यपदार्थ, डेरी व बेकरी उद्योग, कृषी पणन, व बँकिंग तसेच आयुर्वेदिक औषध उत्पादक अशा प्रकारचे विविध 250 पेक्षा अधिक स्टॉल महोत्सवांमध्ये सहभागी झाले. कृषी महोत्सवाचे नियोजन पुणे जिल्हा अग्रो डीलर्सचे अध्यक्ष महेश मोरे यांनी तर कृषी महोत्सवाचे उद्घाटन अनुसया महिला उन्नती केंद्र संस्थापक अध्यक्षा किरण वळसे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. चार दिवसीय उपक्रमास अनेक मान्यवरांनी भेट देवून आपला सकारात्मक अभिप्राय व्यक्त केला.
सहकारमंत्री दिलीप वळसे, आमदार अतुल बेनके,शरद बँकेचे अध्यक्ष देवेद्र शहा यानी भेटी देऊन कौतुक केले. आड़त व्यापारी असोसिएशने लकी ड्रॉ भरवून बक्षीस वितरण केले. तसेच रोटरी क्लब ऑफ मंचर यांनी चिंतामणी ज्वेलर्सच्या वतीने बुलेट लकी ड्रॉचे नियोजन केले. त्यामध्ये शारदा थोरात चांडोली या विजेत्या ठरल्या. कृषी महोत्सव यशस्वी करण्यासाठी महेश मोरे, प्रशांत बागल, सचिन काजळे, बाळासाहेब पोखरकर, जयेश शिंदे, माउली चव्हाण, सचिन चिखले, सचिन निघोट इत्यादींनी प्रयत्न केले .