सातारा – पंचम ग्रुप १८ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यावर्षीचा पहिला कार्यक्रम शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोजी शाहूकला मंदिर येथे सायं. ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या सत्रामध्ये पं. जसराज यांची शिष्या अंकिता जोशी हिचे शास्त्रीय गायन होणार आहे. दुसऱ्या सत्रात आजचे आघाडीचे तबला वादक पं. योगेश सम्सी व यशवंत वैष्णव यांचे तबला सहवादन होणार आहे. तरी सर्व सातारकर रसिकांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंचम ग्रुप यांचेवतीने करण्यात आले आहे.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या मूळ उद्देशाने २००७ साली पंचम ग्रुपची स्थापना झाली. पंचम ग्रुपतर्फे शास्त्रीय गायन, वादन आणि नृत्य असे कार्यक्रम आयोजित केले जातात. एका वर्षामध्ये चार कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. गेल्या १७ वर्षांमध्ये पंचम ग्रुप तर्फे अनेक नामांकित कलाकारांनी आपली कला पेश केली आहे. उस्ताद झाकीर हुसेन, पं. शिवकुमार शर्मा, उस्ताद राशिद खान, पं. रोणू मुझुमदार, उस्ताद शाहिद परवेझ, पं. राहुल देशपांडे, पं. शौनक अभिषेकी, नृत्यांगना शर्वरी जमेनिस अशा अनेक कलाकारांनी आपली सेवा साताऱ्यात रूजू केली आहे.
दरम्यान, पंचम ग्रुपची वार्षिक नोंदणी सुरू आहे. तसेच कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना विशेष सवलत देण्यात येते. देणगी प्रवेशिका व नोंदणी अर्ज देवकुळे वॉच कंपनी, मोती चौक, ड्रेसवेल मेन्स् नगर पालिका शॉपींग सेंटर केसरकर पेठ व राज मेडिकल्स्, पोवई नाका सातारा येथे उपलब्ध आहेत.