पुणे – गोड-आंबट चवीचे द्राक्ष म्हटल्यावर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल. अशा द्राक्षांची हंगामापूर्वीच पुणेकरांना चव चाखता येणार आहे. मार्केट यार्डातील फळविभागात रविवारी (दि.29) पहिली हंगामपूर्व द्राक्षाची आवक झाली. जिल्ह्यातील बारामती आणि सातारा जिल्ह्यातील फलटण भागातून ही आवक होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील द्राक्षांचे व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.
येथील बाजारात दीड ते दोन टन द्राक्षांची आवक झाली आहे. घाऊक बाजारात द्राक्षाच्या 9 किलोच्या कॅरेटला 900 ते 1000 रुपये, तर 5 किलोच्या निवडक मालाच्या पनेटच्या पार्किंगला 600 ते 800 रुपये भाव मिळत आहे. साधारणपणे 15 डिसेंबर ते एप्रिल अखेरपर्यंत द्राक्षांचा हंगाम असतो. मात्र, अलीकडच्या काळात काही शेतकरी आगाप माल बाजारात आणत असतात. तशी आवक सुरू झाली आहे.
बाजारात दाखल झालेल्या मालाची महाबळेश्वर, लोणावळा या पर्यटन क्षेत्रातील विक्रेते आणि गुजराथ, अहमदाबाद येथील व्यापाऱ्यांनी खरेदी केली. पोषक वातावरणामुळे दर्जा चांगला आहे. पिकही चांगले आहे. हळूहळू आवक वाढत जाणार आहे. सुरूवातीलाच मागील वर्षीपेक्षा 20 टक्के जास्त भाव मिळाल्याचे यावेळी सांगण्यात आले. राज्यासह परराज्यातील बाजारपेठामधून मागणी राहणार आहे.
“द्राक्षाला यंदा पोषक वातावरण आहे. दर्जेदार मालाची आवक मार्केट यार्डातील फळ विभागात झाली आहे. द्राक्षांना चांगली मागणी आहे. त्यामुळे यंदा जास्त भाव मिळण्याची शक्यता आहे.” – अरविंद मोरे, द्राक्षांचे व्यापारी, मार्केट यार्ड.