पुणे – उंड्री परिसरातील एका उच्चभ्रु सोसायटीत वास्तव्यास असलेल्या माजी पोलिस महासंचालकांच्या सदनिकेसह इतर दोन ठिकाणी घरफोडी करून तब्बल 1 कोटी 34 लाख 95 हजार 641 ऐवज चोरून पोबारा करणार्या दोघांना कोंढवा पोलिसांनी अटक केले.
आत्तापर्यंत त्यांच्याकडून पोलिसांनी 39 तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. दोघे ही पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी दिली.
राजेशकुमार मोहनलाल सरोज (वय.33,रा. नवी दिल्ली मुळ उत्तर प्रदेश) राकेशकुमार मोहनलाल सरोज (वय.30, रा. उत्तर प्रदेश) अशी दोघा भावांची नावे आहेत. तर चोरीचे सोने घेणारा पालघर येथील सोनार मदनलाल मोहनलाल कुमार (वय.33,रा. रॉयल डॉन बास्को शाळेसमोर पालघर) याला देखील अटक करण्यात आली आहे.
राजेशकुमार व राकेशकुमार पेशाने दोघेही सराफी आहेत. त्यामुळे चोरी केलेले सोने वितळवण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंतची सर्व माहिती त्यांना आहे. त्यांनी महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी चोर्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. एकाला हरियाणा येथून वर्ग करून घेण्यात आले आहे. तर दुसर्याला उत्तरप्रदेेशातून ताब्यात घेतले आहे.