लखनौ – अयोध्येतील जमीन घोटाळा उघड करणारे आम आदमी पक्षाचे खासदार संजयसिंह यांच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे. ही माहिती त्यांनी स्वत:च ट्विटरवर दिली असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझा जीव गेला तरी मी अयोध्येतील मंदिरासाठी प्रभू रामचंद्रांच्या नावाने जमवण्यात आलेल्या पैशांची चोरी होऊ देणार नाही. तेथील चोऱ्या रोखणे हे माझे कर्तव्यच आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
भाजपच्या लोकांनी कितीही गुंडागर्दी केली तरी मी त्यांना तेथे चोऱ्या करू देणार नाही असेही संजयसिंह यांनी म्हटले आहे. संजयसिंह यांनी नुकताच अयोध्येतील जमीन घोटाळा उघड केला आहे. त्यात अयोध्या ट्रस्टच्याच पदाधिकाऱ्यांनी किमान साडेसोळा कोटी रुपयांच्या रकमेचा भ्रष्टाचार केल्याचा त्यांचा आरोप आहे.
ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी एक निवेदन प्रसिद्धीला देऊन हे आरोप फेटाळले असले तरी यातील बऱ्याच बाबींचा अजून खुलासा झालेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान संजयसिंह यांच्या घरावर कोणी व कधी हल्ला केला याचा तपशील मात्र त्यांनी ट्विटरवर दिलेला नाही.