पुणे – फिल्म अॅंड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया या संस्थेत वादग्रस्त बॅनर लावण्यावरुन वाद उफाळला. बाहेरील काही विद्यार्थी संघटनांनी संस्थेच्या आवारात जाऊन हा बॅनर जाळला. तर, या संघटनेच्या सदस्यांना संस्थेतील विद्यार्थ्यांनी मारहाण केली. यानंतर डेक्कन पोलीस ठाण्यात मोठा जमाव एकत्र आला होता. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
संस्थेमध्ये एफटीआयआय स्टुडंट असोसिएशन संस्थेच्या नावाने वादग्रस्त मजकूर असलेला बॅनर झळकला होता. बाहेरील विद्यार्थी संघटनांना याची माहिती मिळताच दहा ते बारा जणांचा जमाव एफटीआयआय संस्थेत आला. त्यांनी बॅनर फाडून संस्थेच्या आवारात जाळला. दरम्यान, संस्थेतील मुलांनी बॅनर जाळणाऱ्यांना धक्का-बुक्की केली. यानंतर जमाव निघून गेला. ही बाब इतर संघटनांना कळाल्यावर डेक्कन पोलिसांत धाव घेण्यात आली. पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल हे पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत केले.