पुणे – महापालिकेकडून प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी डी. पी. रस्ता विकसित करण्याते येणार असून या रस्त्याच्या कामासाठी 1 कोटी 76 लाख 76 हजार रूपयांच्या खर्चास मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यामुळे सिंहगड रस्त्यावरून नांदेड सिटीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्त्या उपलब्ध होणार असून मुख्यरस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
या रस्त्यासाठी सुमारे 1 कोटी 76 लाख 76 हजार रुपये खर्च येणार असल्याचे समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुमारे 1.8 किलोमीटरचा हा रस्ता असून त्याची रूंदी 30 मीटर आहे. तर जागा ताब्यात घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता तयार करून वाहतूकीसाठी खुला केला जाणार आहे.
नांदेड सिटीकडे जाण्यासाठी सध्या सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे, महामार्गावरून आलेली वाहने तसेच मुख्य रस्त्याने आलेली वाहने वडगाव पूलापासून धायरी मधून पुढे नांदेड सिटीकडे आणि शिवणे मध्ये या मार्गावरून जातात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या शिवाय, नांदेड सिटीच्या जवळच महापालिकेची पंतप्रधान आवास योजनेतील घरे बांधण्यात आलेली असून त्यांनाही याच मार्गाने जावे लागते.
त्यामुळे, महापालिकेकडून प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी हा रस्ता डीपी रस्ता प्रस्तावित करण्यात आला होता. त्यासाठी या वर्षीच्या अंदाजपत्रकात सुमारे 2 कोटी 10 लाखांची तरतूदही करण्यात आली होती. त्यानंतर प्रशासनाकडून या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. ही निविदा अखेर मंजूर करण्यात आली असल्याने नांदेड सिटी मधून थेट पुणे – बेंगलोर महामार्गाकडे जाण्यासाठी अवघ्या दिड किलोमीटर अंतराचा थेट रस्ता उपलब्ध होणार आहे, तसेच या मार्गाने पुढे वारजे अथवा सनसिटी मधून मुख्य रस्त्याने स्वारगेटकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.