नवी दिल्ली – भारतीय वंशाचे प्रसिद्ध अमेरिकी अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीप्रकाश प्रकाशचंद्र कोठारी यांना पद्मश्री पुरस्काराने सोमवारी गौरवण्यात आले. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या शानदार सोहळ्यात कोठारी यांना अन्य मान्यवरांसह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा किताब प्रदान करण्यात आला.
दरवर्षी गणतंत्र दिनाच्या पूर्वसंध्येला पद्मश्री या देशातील अत्यंत सन्मानाच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते. काल अर्थात सोमवारी राष्ट्रपती भवनातील दरबार हॉल येथे झालेल्या सोहळ्यात या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी अर्थतज्ज्ञ श्रीप्रकाश कोठारी यांचाही गौरव करण्यात आला. डॉ. कोठारी यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्सेसमधून अभियांत्रिकीची आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीएची पदवी मिळवली आहे.
त्यांनी अमेरिकेतील मॅसेच्युसेटस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधील स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये अकाउंट आणि फायनान्स या विषयांचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. गेली दोन दशके त्यांनी एमआयटीमध्ये प्राध्यापक आणि प्रशासक म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. फायनान्शिअल रिपोर्टिंग, व्हॅल्यूएशन, ऍसेट ऍलोकेशन, इंटरनॅशनल अकाउंटिंग प्रॅक्टिसेस, इन्व्हेस्टमेंट, परफॉर्मन्स अँड डेरिव्हेटिव्हज आदी विषयांवर त्यांचे संशोधन आहे.
अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या व्हाइट हाऊसच्या सिक्युरिटी अँड एक्स्चेंज कमिशनचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि इकॉनॉमिक अँड रिस्क ऍनालिसिस विभागाचे संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे.