पुणे- शिक्षक पात्रता परीक्षेत शिक्षण विभागातील अधिकारी, परीक्षा आयोजित करणारी कंपनी व एजंट यांनी तब्बल 1,701 अपात्र परीक्षार्थींना पात्र केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघडकीस आले आहे.
आरोपींनी सदर 1,701 अपात्रांपैकी मूळ निकालात 817 जणांचे मार्क्स वाढवून त्यांना पात्र ठरवले आहे. तर, एकूण 884 जणांना अंतिम निकालानंतर पात्र करुन त्यांची नावे राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करुन त्यांना बनावट प्रमाणपत्र दिल्याची गोष्ट चौकशीदरम्यान समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रध्दा डोलारे यांच्या न्यायालयात दाखल केले आहे.
परीक्षा परिषदेचा माजी अध्यक्ष सुखदेव डेरे (अहमदनगर), तुकाराम सुपे (पुणे), जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीचा माजी संचालक अश्विनकुमार (बंगळुरू), डॉ. प्रीतिश देशमुख (रा. पुणे, मूळ वर्धा), शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, एजंट संतोष हरकळ, अंकुश हरकळ (औरंगाबाद), स्वप्नील पाटील (रा. नाशिक), सुरंजीत पाटील (नाशिक), मुकुंद सूर्यवंशी (नाशिक), निखील कदम (पुणे) अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी आणखी 16 आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी आरोपींनी संगनमत करुन प्रत्येक परीक्षार्थ्यामागे 50 हजार ते अडीच लाख रुपयांपर्यत रक्कम घेतल्याचे चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणात पोलीसांनी एकूण 101 साक्षीदारांचे जबाब नोंदवले असून, आतापर्यंत 5 कोटी 37 लाखांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंत निष्पन्न झाले आहे.