पुणे – पीएमपीएमएलच्या ताफ्यात लवकरच 500 नवीन ई-बसेसचा सहभाग करण्यासोबतच दीड हजार बसथांबे बीओटी तत्वावर उभारण्यात येणार आहेत. तसेच पीएमपीच्या मोक्याच्या 11 जागांचा पीपीपी तत्वावर व्यावसायीक दृष्टीकोनातून विकास करण्यात येणार असून चार्जींग स्टेशन्सही उभारण्यात येणार असल्याची माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. यात पीएमपीएमएलने आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठीही काही निर्णय घेतले आहेत. यामध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड व लगतच्या ग्रामीण भागांत प्रवाशांची सोय तसेच उत्पन्नवाढीच्या दृष्टीने 1 हजार 500 बस शेल्टर्स जाहिरातीच्या बदल्यात बीओटी तत्वावर उभारणीचा निर्णय घेतला असून, त्याकरिता निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. तसेच महामंडळाकडील डेपो, पार्किंग आदीसाठी वापरात असलेल्या 11 जागा व्यापारी तत्वावर विकसित करण्यासही संचालक मंडळांनी मान्यता दिली असून, ही एकूण जागा 41 एकर इतकी आहे. या सर्व माध्यमातून महामंडळाला उत्पन्न सुरू झाल्यास कोणाकडूनही आर्थिक निधीची गरज भासणार नसल्याचा दावा करण्यात आला आहे.
संचालक मंडळातील अन्य निर्णय
10 वर्षे वयोमान झालेल्या डीझेल व सीएनजी बसचे इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे.
महामंडळाकडील डेपो, बसस्थानके, ऍमिनिटी स्पेस तसेच मोक्याच्या जागी सात ठिकाणी पब्लिक चार्जिंग स्टेशनची ठेकेदारामार्फत उभारणी करणे.
ई-वाहनांना चालना देण्यासाठी इलक्ट्रिक बस पीएमपीएमएलची प्रतिकृती स्वारगेट चौकात बसविणे.
बीआरटी कॉरिडॉरमध्ये प्रत्येक चौकात बुम बॅरिअर बसविणे.