करोना काळानंतर उपक्रमाला दानशुरांचा पुन्हा प्रतिसाद
पुणे – सर्वसामान्य नागरिकांमध्ये वन्य प्राण्यांबाबत जागृती व्हावी, प्राणी संवर्धनात त्यांचाही सहभाग असावा यासाठी कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयाच्या वतीने “प्राणी दत्तक’ योजना राबविण्यात येते. करोनामुळे दोन वर्षे ही योजना बंद होती. त्यानंतर या उपक्रमाला पुन्हा प्रतिसाद मिळत आहे.
मागील दहा महिन्यांत सुमारे 42 नागारिकांनी प्राणी दत्तक घेतले आहेत. त्यातून 2 लाख 31 हजार रुपयांचे उत्पन्न प्राणी संग्रहालयास मिळाले आहे. तसेच स्वयंसेवी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून हे प्राणी दत्तक घेतले जातात. त्या अंतर्गत प्राण्यांच्या 1 दिवस, 1 महिना व 1 वर्षासाठीचा अन्नाचा खर्च दिला जातो. महापालिकेने 2010-11 या वर्षात ही योजना सुरू केली होती. त्यानंतर 2019 पर्यंत त्याला चांगला प्रतिसाद मिळत होता. करोना काळात ही योजना बंद होती. त्यानंतरही काही नागरिकांनी या योजनेत सहभाग नोंदवत सामाजिक भान जपले आहे.
आकडा वाढला
2019-20 मध्ये 30 प्राणी दत्तक घेण्यात आले होते. तर 2020-21 मध्ये कोविडच्या काळात ही संख्या अवघी 12 वर आली. तर 2021-22 मध्ये अवघ्या 10 जणांनी प्राणी दत्तक घेतले. त्यानंतर 2022-23 मध्ये ही संख्या 39 वर गेली. तर, 2023-24 या वर्षाच्या पहिल्या दहा महिन्यांत हा आकडा 42 वर गेल्याचे प्राणी संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. राजकुमार जाधव यांनी सांगितले.
दत्तक घेण्यास बिबट्या, साप, कासवांना प्राधान्य
संग्रहालयातील वाघ, बिबट्या, साप, कासव आणि हरिणांना दत्तक घेण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे. तर हत्तीचा खर्च जास्त असल्याने तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. सोबतच मोर, माकड दत्तक घेतले जात आहे. मात्र लांडगा, गवा, तरस, अजगर, अस्वल यांना दत्तक घेण्यास कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र आहे. तर इतर प्राण्यांच्या तुलनेत मगरही वर्षभरात एखाद्यावेळीच दत्तक घेतली जात आहे.