पुणे- महापालिकेच्या ताब्यातील सेवा क्षेत्र (ऍमेनिटी स्पेस) खासगी विकसकांना देण्याच्या निर्णयावरून राष्ट्रवादीत पेटलेल्या गृहकलहाची धग आता भाजपपर्यंत आली आहे.
पक्षाच्या 20 ते 25 नगरसेवकांनी या निर्णयास विरोध करत तशी भूमिका पदाधिकाऱ्यांना कळवली आहे. यावर चर्चेसाठी या नगरसेवकांची बैठक नुकतीच झाली आहे. त्यामुळे या प्रस्तावावरून भाजपची कोंडी होण्याची चिन्हे आहेत.
करोनामुळे झालेली वित्तीय तूट भरून काढणे, तसेच अतिक्रमणे रोखण्यासाठी 185 ऍमेनिटी स्पेस भाडेकराराने देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीत ठेवला.त्यास बहुमताने मान्यता देण्यात आली. या जागांमध्ये विकास आराखड्यातील आरक्षणापोटी ताब्यातील आणखी 85 जागा उपसूचनेने वाढवण्यात आल्या.
हा प्रस्ताव मंजूर व्हावा, यासाठी भाजपने राष्ट्रवादीला गळ घातली. त्यानंतर राष्ट्रवादीने काही अटी-शर्थी भाजपने मंजूर केल्यास या प्रस्तावास पाठिंबा देण्याची भूमिका घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात वाद झाले. त्यामुळे भाजपने बहुमताने हा निर्णय मंजूर करण्याचे ठरवले. मात्र, दोन वेळा या विषयाची सभा तहकूब करण्यात आली आहे.