पुणे- प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने महापालिकेला महिनाभराची मुदत दिली होती. या प्रक्रियेसाठी उपलब्ध अत्याधुनिक साधने पाहता, हे काम त्यापेक्षाही कमी दिवसांत होणे शक्य आहे. पण, प्रभाग रचनेसाठी महापालिका प्रशासनाने आणखी 15 दिवसांची मुदत मागितली आहे. राजकीय दबावातून ही मुदत मागितल्याची तक्रार “आपले पुणे’ संस्थेने राज्य निवडणूक आयोग तसेच नगरविकास विभागाकडे केली आहे. तसेच निवडणुका पुढे ढकलण्यासाठी ही खेळी असल्याचा आरोप ही करण्यात आला आहे.
संस्थेने दिलेल्या पत्रानुसार, “विहित मुदतीत म्हणजे 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत प्रभाग रचना पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पंधरा दिवसाची मुदत मागितली आहे. हे एक राजकीय षड्यंत्र आहे. राज्यातील सत्ताधाऱ्यांना सध्याचे वातावरण निवडणुकीसाठी अनुकूल नाही. प्रत्यक्षात महाविकास आघाडीतील घटक पक्ष “एकत्र न येता’ प्रत्येक जण आपल्याला सोयीची कुठली “प्रभाग’ रचना आहे त्याचे “नकाशे” बनवून ते अधिकाऱ्यांना देत आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कसे बसवायचे, असा संभ्रम या अधिकाऱ्यांत आहे असे कळते. एक पक्ष ज्यांच्याकडे पालकमंत्री पद आहे. दुसरा पक्ष ज्यांच्याकडे नगरविकास खाते आहे आणि तिसरा पक्ष आमच्या पाठिंब्यामुळेच हे सरकार आहे, असे सांगतात.
त्यामुळे नेमके कोणाचे ऐकायचे, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. त्यामुळेच ही मुदतवाढ मागण्यात आली आहे. अशा प्रकारे कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने वेळेत काम करावे. तसेच निवडणुका वेळेत होण्यासाठी नियोजनाप्रमाणेच कामकाज व्हावे,’ अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.