पुणे –जिल्हा परिषदेवर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेचे कामकाज नियोजनबद्ध आणि जलदगतीने चालविण्यासाठी सीईओ यांच्या सूचनेनुसार सल्लागार समिती गठीत केली आहे. या समित्यांमार्फत कामकाज केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती, उपसभापती यांची एकाचवेळी पदे रिक्त झाली आहेत. त्यामुळे 14 मार्चपासून पंचायत समित्यांवर, तर सोमवारपासून (दि.21 मार्च) जिल्हा परिषदेवर प्रशासक आले आहे. आता जिल्हा परिषदेचे कामकाज सल्लागार समित्यांमार्फत चालणार आहे. त्यासाठी सर्वसाधारण सभेच्या अनुषंगाने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आठ सदस्यीय समिती गठीत केली आहे. त्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक, सर्व विभाग प्रमुख, सर्व गटविकास अधिकारी, ग्रामसेवक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांची सदस्यपदी नियुक्त करण्यात आली. दोन निमंत्रित असणार आहेत, तर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सचिव असणार आहेत.
असे असणार समितीचे कामकाज
स्थायी समिती, जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीचे अध्यक्ष अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली काम चालणार आहे. विषय समितीचे कामकाज मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चालणार आहे. जिल्हा ग्रामीण विकास निधी समितीच्या अध्यक्षपदी प्रकल्प संचालक, दोन सदस्य आणि सचिव नियुक्त करण्यात आले आहेत. पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली. सरपंच सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी संबंधित तालुक्याचे सहायक गटविकास अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य सरपंच आणि विस्तार अधिकारी सदस्य सचिव असणार आहेत.