वानवडी –स्वारगेटकडून गोळीबार मैदान चौकातून कोंढव्याकडे वळण्यास “नो एंट्री’ असताना या चौकातून वाहने मोठ्या प्रमाणात विरुद्ध दिशेने वळत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाल्याबाबत “प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. याची दखल घेत वाहतूक पोलिसांनी या चौकात कारवाईला सुरू केली आहे.
स्वारगेटच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना गोळीबार मैदान चौकातून पुढे पुलगेटकडे व कोंढव्याकडे जाण्यास वाहतूक विभागाने प्रवेश बंद केला आहे. त्याच सुमारास लुल्लानगर, कोंढव्याकडून गोळीबार मैदानातून पुणे कॅम्पकडे जाणाऱ्या वाहनांस एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे स्वारगेटकडून येणाऱ्या वाहनचालकांना हडपसर व कोंढव्याकडे जाण्यासाठी गोळीबार मैदान चौकातून पुणे कॅम्पकडील रस्त्याकडे वळून पुढे जाऊन वाहनांना महात्मा गांधी बसस्थानकाकडून हडपसर व कोंढव्याकडे जाता येते.अनेक दुचाकी वाहनचालक अशा प्रकारचा वळसा घ्यावा लागत असल्याने गोळीबार मैदानातूनच बंदी असतानाही कोंढव्याकडे वळतात, त्याच सुमारास हडपसर बाजूने स्वारगेटकडे जाणारी वाहने भरधाव वेगाने स्वारगेटच्या दिशेने जात असतात, त्यासुमारास बंदी असलेल्या रस्त्याकडे वळताना वाहनांची धडक बसण्याचे अनेक प्रकार येथे घडत आहेत. वाहतूक पोलीस पुणे कॅम्पकडील रस्त्यावरच वाहतुकीवर नियंत्रण करण्यासाठी उभे असतात, त्यामुळे वाहनचालक भेदडकपणे वाहने लुल्लानगर कोंढव्याकडे वळवतात. विरूद्ध दिशेने येणारी वाहने समोरून येत असल्याने या चौकात वाहनांना धडक बसून अपघात, वाद होत असल्याने पोलिसांनी नो एंट्रीत जाणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.