नवी दिल्ली – केदारनाथ मंदिरासमोर तरुणीचे तरुणाला प्रपोज केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच होतोय. केदारनाथ मंदिर समितीने (बीकेटीसी) उत्तराखंडच्या केदारनाथ मंदिरासमोर केलेल्या या व्यक्तींच्या कृतीवर आक्षेप घेतला आहे. प्रपोज करणाऱ्या तरुणीने ‘भोलेनाथाचा आशीर्वाद’, असे म्हणत हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता.
मंदिर समितीने पोलिसांना याबाबत पत्र लिहिले आहे. असे व्हिडिओ आणि रिल्स बनवल्याने भाविकांवर विपरीत परिणाम होत असल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी यावर कारवाई करू, असे म्हटले आहे. व्हिडिओमध्ये एक जोडपे केदारनाथ धाममध्ये पूजा करताना दिसत आहे. काही वेळाने व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती मुलीला अंगठीचा बॉक्स देतो. ती मुलगी गुडघ्यावर बसून मुलाला प्रपोज करते. मुलीचे हे कृत्य पाहून आजूबाजूचे लोकही हैराण झाले आहेत. काही लोक त्यांच्या मोबाईलमध्ये ही घटना रेकॉर्ड करताना दिसतात.
हा व्हिडिओ तरुणीने तिच्या सोशल मीडियावर पोस्ट करताना, खूप नियोजन केल्यानंतर हे घडून आले. समुद्रसपाटीपासून 11 हजार 750 फूट उंचीवर असलेल्या केदारनाथ मंदिरात मी त्याला प्रपोज केले. हे ठिकाण खरोखर जादुई आहे. भोलेनाथांच्या आशीर्वादाने अखेर त्यांने हा प्रस्ताव स्वीकारला. मी माझा आनंद व्यक्त करू शकत नाही,’ असे म्हटले आहे.
यावर आता, पोलिसांनी मंदिरात कडक बंदोबस्त ठेवावा, असे बीकेटीसीने म्हटले आहे. व्हिडिओ बनवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. युटयूबर्स आणि रिलस्टार्स केदारनाथ मंदिराभोवती व्हिडिओ बनवून भाविकांच्या भावना दुखावत आहेत. याचा विपरीत परिणाम मंदिराच्या पावित्र्यावर, केदारनाथला येणाऱ्या भाविकांवर होत आहे, असेही समितीचे म्हणणे आहे.