पुणे – केंद्र सरकारने परदेशी विद्यापीठांना भारतात शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची मुभा दिली आहे. याउलट सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडे आता कझाकिस्तान, जॉर्जिया, नेपाळ अशा देशांतून शैक्षणिक केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कतार देशानंतर आता अन्य देशातही शैक्षणिक केंद्र सुरू करण्यासाठी पुणे विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी ही माहिती दिली. देशातून उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे परदेशी विद्यापीठांना भारतात शैक्षणिक केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कतारमध्ये शैक्षणिक केंद्र सुरू केले आहे. त्यानंतर आता अन्य काही देशांकडूनही मागणी करण्यात येत असल्याने विद्यापीठ त्याबाबत सकारात्मक पाऊल उचललणार आहे.
डॉ. गोसावी म्हणाले, कतार येथील शैक्षणिक केंद्राला चांगला प्रतिसाद आहे. यंदा चांगल्या संख्येने प्रवेशही झाले आहेत. एक-दोन देशांना भेटही देण्यात आली आहे. आता मान्यता आणि अन्य तांत्रिक प्रक्रिया तपासून त्या देशांमध्ये शैक्षणिक केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान, कतार येथील केंद्रात यंदापासून वाणिज्य पदवी (बी. कॉम.), व्यवस्थापन पदवी (बीबीए) आणि भौतिकशास्त्र शाखेत विज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. तर पुढील वर्षीपासून जैवतंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन आहे.