पुणे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी आरोग्यविभागाची लगबग सुरू झाली असून, ते महापालिकेत येणार असल्याने तेथील आरोग्यविषयक सुरक्षेची जबाबदारी आरोग्यविभागावर सोपवण्यात आली आहे. त्यामुळेच त्यादृष्टीने त्यांनी तयारी सुरू केली आहे.
पंतप्रधानांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर उपस्थित राहणार असलेल्या अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे “आरटीपीसीआर’ चाचणी करण्यात येणार आहे. त्यात पॉझिटिव्ह आढळल्यास संबंधितांना लगेचच विलगीकरणात रहावे लागणार आहे. या तपासणीसाठी रॅपीड अँटीजेन चाचणी घेणाऱ्या स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. रविवारी सकाळी हे पथक महापालिकेत असणार आहे. जागेवरच निगेटिव्ह-पॉझिटिव्हचा सोक्षमोक्ष केला जाणार आहे.
याशिवाय संपूर्ण महापालिकेचे सॅनिटायझेशन करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या आवारात दोन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त लाइफ सपोर्ट रुग्णवाहिका, एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानाजवळ म्हणजे रुग्णवाहिका तसेच प्रथमोपचारासाठी संचेती रुग्णालय आणि इतर उपचारांसाठी ससून रुग्णालय सज्ज ठेवण्यात येणार असल्याची माहिती, महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली.