वाराणसी – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्याच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी नेत्यांच्या प्रचारावर लक्ष केंद्रित झाले आहे. निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 7 मार्च रोजी होणार आहे. वाराणसी आणि शेजारच्या 8 जिल्ह्यांमधील विधानसभा मतदार संघांमध्ये हे मतदान होणार आहे.
वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभेसाठीचा मतदार संघ असल्यामुळे भाजपसाठी हा प्रतिष्ठेचा विषय आहे. अर्थातच या ठिकाणी स्वतः पंतप्रधान प्रचारासाठी येणार आहेत. पंतप्रधान 5 मार्च रोजी वाराणसी आणि दक्षिण वाराणसीमध्ये रोड शो करणार आहेत. त्यानंतर खाजुरी गावामध्ये ते अखेरच्या सभेला संबोधित करणार आहेत, असे वाराणसीचे भाजप जिल्हा अध्यक्ष विद्यासागर राय यांनी सांगितले. पंतप्रधानांचा रोड शो कॅन्टोन्मेंट, उत्तर वाराणसी आणि दक्षिण वाराणसी या तीन मतदार संघांसाठी होणार आहे. पंतप्रधान काशी विश्वनाथ मंदिरालाही भेट देणार आहेत.
विरोधी पक्षांचेही प्रमुख नेते या अखेरच्या टप्प्यामध्ये वाराणसीमध्ये डेरेदाखल होणार आहेत. कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वडेरा आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती या देखील वाराणसीच्या मैदानात उतरल्या आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल हे वाराणसीमध्ये प्रचारासाठी येणार आहेत की नाही हे समजू शकलेले नाही. मात्र त्यांचे सहकारी संजय सिंह हे वाराणसीच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून प्रचाराचे नियोजन करत आहेत.
2017 च्या विधानसभेच्या निवडणूकीत मोदी लाटेवर स्वार होऊन वाराणसी जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघांपैकी 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. अपना दल (एस) आणि राजभर यांच्या “एसबीएसपी’ने प्रत्येकी एक जागा जिंकली होती.