रकमेच्या मर्यादेच्या अडचणीत अनेकांची कोंडी
पुणे – वर्षानुवर्षे थकीत असलेल्या महापालिकेच्या मिळकतकर वसुलीसाठी पालिकेकडून अभय योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत जवळपास 389 कोटींचा महसूल जमा झाला आहे. तर, ही योजना केवळ 50 लाखांच्या आतील थकबाकीदारांसाठी आहे. त्यामुळे 50 लाखांच्या पुढील थकबाकीदारांनाही या योजनेत आणता येईल का, याबाबत चाचपणी सुरू आहे.
अनेक थकबाकीदारांची थकबाकीची रक्कम 50 लाख 50 हजारांच्या आत आहे. तर, काहींची रक्कम 50 लाख 10 ते 15 हजार रुपये आहे. त्यामुळे वरील केवळ काही हजार रुपयांसाठी तयारी असूनही थकबाकीदारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे स्थायी समितीकडून प्रशासनाशी याबाबत चर्चा करण्यात येत आहे.
महापालिकेच्या मिळकतकराच्या थकबाकीची रक्कम 5 हजार कोटींच्या वर गेली आहे. तर, या थकाबाकीवर आकारण्यात येणाऱ्या दंडाची रक्कम मोठी असल्याने ही थकबाकी वाढली आहे. त्यामुळे अनेकजण कर भरण्यास तयार असले तरी त्यांच्याकडून दंड माफ करण्याची मागणी केली होती. त्याला, प्रतिसाद देत पालिकेने 2 ऑक्टोबरपासून 50 लाखांच्या आतील थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू केली आहे. त्यात पहिल्या योजनेत तब्बल 354 कोटींचा कर जमा झाला आहे.
तर मुदतवाढीनंतर सुमारे 27 कोटींचा महसूल जमा झाला आहे. त्याचवेळी 50 लाखांच्या वर थकबाकी असलेल्या मिळकती सील करण्याचे काम सुरू आहे. मात्र, अनेक थकबाकीदारांची रक्कम 50 लाखपासून 50 लाख 20 हजारांपर्यंत आहे. तसेच ते कर भरण्यासही तयार आहेत. मात्र, एका बाजूला एवढा कर भरण्याची तयारी असताना केवळ 5 ते 10 हजारांच्या रकमेपोटी त्यांना कर भरता येत नाही. त्यामुळे अशा थकबाकीदारांनी तसेच काही नगरसेवकांनीही 50 लाखांच्या पुढे थकबाकीसाठी अभय योजना सुरू करण्याची मागणी केली आहे.
अनेक थकबाकीदारांकडून 50 लाखांच्या वरही अभय योजना लागू करण्याची मागणी केली आहे. त्यात काही थकबाकीदार तर केवळ काही हजार रुपयांमुळे या योजनेत बसत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन थकबाकी देता येईल का याबाबत विचार सुरू आहे. प्रशासनाशी चर्चा करून त्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच कोणताही निर्णय घेताना महापालिकेचे उत्पन्न कसे वाढेल यालाच प्राधान्य दिले जाईल.
– हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती