पुणे – महानगरपालिकेच्या शिवदर्शन येथील राजीव गांधी ऍकॅडमी ऑफ ई-लर्निंगमध्ये आनंदाने व उत्साहाने येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विदूषकांनी स्वागत करत मोठा जल्लोष झाला. या सुखद व अनपेक्षित स्वागतामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित होऊन विद्यार्थ्यांनी विदूषकांभोवती गराडाच घातला.
विद्यार्थी आत आल्यावर एक विदूषक विद्यार्थ्यांना गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा देत स्वागत करीत होता. तर दुसरा विदूषक मास्क देत होता. तसेच या शाळेची संकल्पना मांडून त्याची पूर्तता करणारे पुणे महापालिकेतील कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल व शिक्षक विद्यार्थ्यांना पेढा व चॉकलेट देत होते. तसेच सॅनिटायझरची बाटलीही दिली जात होती. विद्यार्थ्याचे विदूषकाबरोबर मोबाइलमधून छायाचित्रही काढत होते. आपल्या पाल्यांच्या या विदूषकांसहच्या आपलेपणाच्या स्वागताने पालकही भारावले होते.
यावेळी माजी आमदार मोहन जोशी, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, विद्या प्राधिकरणचे संचालक एम.डी.सिंह, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत, माध्यमिक शिक्षण विभागाप्रमुख शिवाजी दौंडकर, पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी स्मिता गौड आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षण आयुक्तांनी वर्गावर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि दीड वर्षाच्या कालावधीनंतर शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक प्रश्न विचारून त्यांची जणू बुद्धिमत्ता चाचणीच घेतली. या विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व उत्तरे देण्याची सफाई बघून त्यांनी विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर शिक्षकांचेही कौतुक केले. याबरोबरच शाळेतील शिक्षकांबरोबरही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला.
यावेळी शाळेतील प्रमुख अश्विनी ताठे, सुपरवायझर ज्योती ताठे, योगिता पाटील, शिक्षिका रिबेका मगर, सानिया शेख, सुनीता बाणमारे यांच्यासह नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, रमेश भंडारी, अमित बागुल, नंदकुमार कोंढाळकर, विलास रत्नपारखी, सुनील भोसले, बाबासाहेब बोळके, इम्तियाज तांबोळी, गोरख मरळ यांसह नागरिक उपस्थित होते.