टोकियो : प्रेम तुम्हाला अनेक कसोट्या पार करायला लावते. प्रसंगी आपले ऐश्वर्य, श्रीमंतीही सोडायला लावते ! होय,सध्याच्या श्रीमंत होण्याच्या ईर्ष्येत राहणाऱ्या जगातील तमाम लोकांसमोर एका राजकुमारीने आपल्या प्रेमासाठी सर्व ऐश्वर्य लाथाडण्याचे धाडस दाखवून एक आदर्श ठेवला आहे. बऱ्याच वर्षांच्या वादानंतर जपानची राजकुमारी माको 26 ऑक्टोबर रोजी तिचा प्रियकर केई कोमुरोसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.
विशेष म्हणजे राजकुमारी माकोचा हा नियोजित वर एका सामान्य कुटुंबातील आहे. अशा परिस्थितीत राजकुमारी केवळ शाही महिलांशी संबंधित रूढी मोडत नाही, तर ती संपूर्ण जगासमोर प्रेमाचे अनोखे उदाहरण ठेवत आहे. तिने आपल्या प्रेमासाठी राजवाडा सोडण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे या अनोख्या प्रेमकहाणीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. चला, जाणून घेऊया या संपूर्ण कहाणीबद्दल.
* कोण आहे राजकुमारी माको ?
राजकुमारी माको प्रिन्स फुमिहितो आणि राजकुमारी किको यांची पहिली आणि मोठी मुलगी असून जपानी राजघराण्याची सदस्य आहे. ती सम्राट नारुहितोची भाची आणि सम्राट एमेरिटस अकिहितो आणि सम्राज्ञी एमेरिता मिचिको यांची मोठी नात आहे.
* राजकुमारी करणार सामान्य माणसाशी लग्न
टोकियोच्या आंतरराष्ट्रीय ख्रिश्चन विद्यापीठात शिकत असताना राजकुमारी माको आणि केई कोमुरो 2012 मध्ये भेटले. मग त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी 2017 मध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली. यापूर्वी दोघांनी 2018 मध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कोमुरोच्या आईचे काही आर्थिक वाद सुरू होते, ज्यामुळे हे जोडपे लग्न करू शकले नाहीत.
* प्रेमासाठी सिंहासन सोडले
राजकुमारी माकोने तिच्या प्रेमासाठी राजघराण्यातील सदस्य म्हणून तिचा दर्जा सोडण्याचा निर्णय घेतला होता. राजघराण्यातील कायद्यानुसार ती लग्नानंतर सामान्य होईल.
* लाखो डॉलर्स घेण्यासही नकार दिला
खरं तर, जपानी कायद्यानुसार जर राजघराण्यातील स्त्रीने सामान्य माणसाशी लग्न केले, तर ती तिच्या विवाहाचा दर्जा गमावेल. मात्र हा कायदा पुरुषांना लागू होत नाही. राजघराण्यातून बाहेर पडणाऱ्या सदस्यांना निश्चित रक्कम दिली जाते. राजकुमारीला 150 दशलक्ष येन (सुमारे 13.5 दशलक्ष डॉलर्स / दहा कोटी रुपये) मिळणार होते परंतु राजकुमारीने ते देखील नाकारण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी सरकारदेखील राजकुमारीच्या रक्कम सोडून देण्याच्या निर्णयाशी सहमत आहे.
* लग्नानंतर जोडपे अमेरिकेत होणार स्थायिक
एका रिपोर्टनुसार राजकुमारी माको तिच्या पतीसोबत लग्न केल्यानंतर अमेरिकेत स्थायिक होण्याचा विचार करत आहे. वास्तविक, ते नुकतेच न्यूयॉर्कमध्ये एकत्र दिसले.
* प्रियकर कोमुरोसाठी अनेक स्थळं नाकारली
माकोने तिच्या वर्गमित्राशी लग्न करण्यासाठी तब्बल सात विवाह प्रस्ताव नाकारले आहेत. राजकुमारी माकोने खुलासा केला की केई कोमुरोने डिसेंबर 2013 मध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, त्यानंतर दोघांनी त्यांचे प्रेम बराच काळ गुप्त ठेवले. त्यानंतर राजकुमारी आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी यूकेला गेली. ती परतल्यावर दोघांनीही लग्नाची घोषणा केली.
* केई कोमुरो कोण आहे?राजकुमारीचा प्रियकर केई कोमुरो एक सामान्य व्यक्ती आहे जो स्कीइंग व्हायोलिन वाजवणे आणि स्वयंपाक करण्यात माहिर आहे. कोमुरो ‘प्रिन्स ऑफ द सी’ म्हणून काम करतो आणि समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाला प्रोत्साहन देतो. सध्या कोमुरो एका लॉ कंपनीमध्ये काम करतो.