एबी, ए पॉझिटिव्ह रक्‍तगटाच्या व्यक्‍तीला करोनाचा अधिक धोका

पुणे -“एबी’ आणि “ए’ पॉझिटिव्ह रक्‍तगटाच्या व्यक्‍ती करोनाची बाधा होण्यासाठी अन्य रक्‍तगटाच्या तुलनेत अधिक संवेदनशील असल्याचा निष्कर्ष “दि कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च’ (सीएसआयआर) यांनी काढला आहे. त्या संबंधातील “रिसर्च पेपर’ही त्यांनी प्रकाशित केला आहे.

“सीएसआयआर’ने रक्‍तगट आणि करोनाची बाधा झालेल्या व्यक्‍ती यांचा परस्पर संबंधावरील एक “रिसर्च पेपर’ सादर केला आहे. त्यामध्ये करोनाला कोणत्या रक्‍तगटाच्या व्यक्‍ती बळी पडतात, या संदर्भातील संशोधन केले. त्यामध्ये “एबी’ आणि “ए’ पॉझिटिव्ह रक्‍तगटाच्या व्यक्‍तींचा बाधितांमध्ये जास्त समावेश असल्याचे संशोधनातून दिसून आल्याचा दावा या रिसर्च पेपरमध्ये केला आहे.

याशिवाय “ओ’ रक्‍तगटाच्या लोकांना या विषाणूचा सर्वात कमी परिणाम झाला. त्यातूनही ज्यांना करोनाची लागण झाली ते बहुतांश “ओ’ रक्‍तगटाचे रुग्ण लक्षणविरहीत किंवा अतिशय सौम्य लक्षण असणारे होते, असेही या पेपरमध्ये नमूद आहे.

एवढेच नव्हे तर “सीएसआयआर’ने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून असेही दिसून आले आहे की, मांसाहार करणाऱ्या व्यक्‍ती या शाकाहारी व्यक्‍तीपेक्षा जास्त प्रमाणात बाधित होतात. याचे कारण असे नमूद केले आहे की, शाकाहारामध्ये जास्त प्रमाणात “फायबर’ असते जे प्रतिकार शक्‍ती वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते.

तसेच करोना संक्रमणानंतर निर्माण होणारी गुंतागुंत रोखू शकते आणि अधिक प्रमाणात संसर्ग होण्याला प्रतिबंधित करते. संपूर्ण देशातील विविध भागातील 10 हजारांपेक्षा जास्तजण या संशोधनात प्रयुक्‍त आहेत आणि 140 डॉक्‍टरांच्या समूहाने हे संशोधन करून वरील निष्कर्षांचे विश्‍लेषण केले आहे.

 

व्यक्‍तीच्या आनुवंशिक संरचनेवर अवलंबून
सर्व काही एखाद्या व्यक्‍तीच्या आनुवंशिक संरचनेवर अवलंबून असते. याचे उदाहरण द्यायचे झाले तर, “थॅलेसिमिया’ ग्रस्त लोकांना मलेरियाचा क्वचितच परिणाम होतो. त्याचप्रमाणे, अशी अनेक उदाहरणे आली आहेत जेव्हा संपूर्ण कुटुंबास करोनाची लागण झाली होती, परंतु कुटुंबातील एखाद्या सदस्याला लागण झालेली नसते. हे सर्व आनुवंशिक संरचनेमुळे होते, असे काही पॅथॉलॉजिस्टचे म्हणणे आहे.

 

…तरीही काळजी घेणे आवश्‍यक
“एबी’ आणि “बी’ गटांच्या तुलनेत “ओ’ रक्‍तगटाच्या लोकांमध्ये या विषाणूविरुद्ध प्रतिकारशक्ती चांगली असू शकते, तथापि सखोल संशोधनासाठी आणि आणखी अभ्यासासाठी हे प्राथमिक संशोधन योग्य आहे. परंतु याचा अर्थ असाही होत नाही, की हे दोन सोडून अन्य रक्‍तगटाच्या व्यक्‍तींनी याबाबत निश्‍चिंत राहिले पाहिजे. त्यांनीही करोना संदर्भातील खबरदारी घ्यायलाच हवी. हे संशोधन प्राथमिक असले तरी यामध्ये अधिक सखोल संशोधन होणे आवश्‍यक आहे, त्यानंतरच या संदर्भातील ठोस निष्कर्ष काढता येणार आहे. त्यामुळे हे संशोधन पूर्णपणे “फुलप्रुफ’ आहे असे म्हणता येणार नाही, असे मत काही तज्ज्ञांनी मांडले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.